
क्रिकेटची पंढरी असलेल्या इंग्लंडमध्ये अविराज याच्या गुगलीची जादू कायम, गुगलीच्या जोरावर सहा विकेटस घेत चौथ्यांदा पटकावला सामनावीर पुरस्कार
सध्या इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळत असलेल्या रत्नागिरीच्या अविराज अनिल गावडे याने आपल्या गोलंदाजीमधून गुगलीची जादू कायम ठेवली आहे. नुकत्याच झालेल्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला त्याने आपल्या गुगलीच्या जोरावर सहा विकेटस घेत चौथ्यांदा सामनावीर पुरस्कार पटकावला आहे.
रत्नागिरीच्या अविराज अनिल गावडे याने इंग्लंडमधील कौंटी क्रिकेट लीगमध्ये खेळताना शनिवारी झालेल्या हर्लिंगटन मिडोज या संघाविरूद्धच्या सामन्यामध्ये मिडलसेक्स पेशवा या संघाकडून खेळताना अष्टपैलू कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला.
या सामन्यामध्ये अविराजने फलंदाजाना आपल्या जादुई गुगलीवर अक्षरशः नाचवले. चार फलंदाजांना गुगलीवर त्रिफळाचीत करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर दोन फलंदाजांना लेगस्पीनवर झेलबाद करून सहा विकेटस आपल्या पदरात पाडल्या.
तसेच क्षेत्ररक्षण करताना तीन अप्रतीम झेल घेत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. अविराजच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार घोषित करण्यात आला. क्रिकेटची पंढरी असलेल्या इंग्लंडमध्ये कौंटी स्पर्धेत अविराज गेले काही सामने आपल्या कामगिरीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यामुळे अविराज याचे रत्नागिरी व जिल्ह्यातून मोठे कौतूक होत आहे.