महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरी येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने सैनिकांसाठी राख्या तयार करण्याचा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत महाविद्यालयाच्या NSS स्वयंसेविकांनी स्वहस्ते आकर्षक व प्रेमपूर्वक राख्या तयार केल्या.
रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा पवित्र सण असतो. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते व तिचे सदैव रक्षण करण्याचे वचन भाऊ तिला देत असतो. अशाच प्रकारे संपूर्ण देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व आदर व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
स्वयंसेविकांनी आपली कला, भावना आणि देशभक्ती राख्यांद्वारे व्यक्त करत, त्या राख्या तयार केल्या. या उपक्रमासाठी NSS कार्यक्रम अधिकारी कु. श्रुती यादव यांचे मार्गदर्शन लाभले.
तयार झालेल्या सर्व राख्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रत्नागिरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या असून, त्यांच्यामार्फत या राख्या 'मराठा लाईट इन्फेन्ट्री' या रेजिमेंटल सेंटरला पोहोचविण्यात येणार आहेत.
असा हा अनोखा उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेच्या उपकार्याध्यक्षा मा.विद्याताई कुलकर्णी, प्रकल्प प्रमुख मा. मंदार सावंतदेसाई , महाविद्यालयाच्या प्राचार्या मा.स्नेहा कोतवडेकर यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले.
अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना रुजविणे, तसेच समाजाशी बांधिलकी निर्माण करणे हे NSS चे उद्दिष्ट प्रभावीपणे साध्य होत आहे.