टँकर अपघाताची मालिका सुरूच,हातखंबा नजीक पुन्हा एकदा टँकरचा अपघात, दुकानांना धडक, टँकर चालक जखमी


रत्नागिरी जवळील हातखंबा येथे पुन्हा एकदा अपघात झाला आहे. सोमवारी सकाळी भरधाव टँकरने रस्त्या शेजारी असलेल्या काही दुकानांना धडक दिली. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात केवळ टँकर चालक जखमी झाला आहे. टँकरने धडक दिल्याने अनेक दुकानांचे नुकसान झाले असून मदतकार्य हाती घेण्यात आले आहे.

दरम्यान, आज पुन्हा एकदा गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. हातखंबा गावाजवळ हा अपघात झाला, ज्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

हा अपघात हातखंबा येथील शाळेजवळ झाला. गॅस वाहतूक करणारा एक टँकर अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका टपरीला आणि काही दुचाकींना धडकला. यात दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या अपघातानंतर लगेचच संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत रास्ता रोको केला. वारंवार होणाऱ्या टँकर अपघातांमुळे ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले आहेत. अपघात झालेले टँकर ज्वलनशील पदार्थ घेऊन जात असल्याने परिसरातील रहिवाशांच्या जीवाला सतत धोका निर्माण होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम होते. याचवेळी शिवसेना नेते बाबू म्हाप देखील घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.

विशेष म्हणजे, चार दिवसांपूर्वी याच भागात गॅस टँकरचा अपघात झाल्याने सुमारे १५ तास महामार्ग ठप्प झाला होता. या वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे महामार्गावरील वाहतुकीची सुरक्षा आणि या भागातील रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले असून, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button