
पहिल्या दिवशी बहुतांशी नौका बंदरातच, मिरकरवाडा बंदरात शुकशुकाट
दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर मासेमारीचा हंगाम १ ऑगस्टपासून सुरू झाला, पण समुद्र पूर्णतः शांत न झाल्याने जिल्ह्यात पहिल्या दिवशी पूर्ण क्षमतेने मासेमारी होवू शकली नाही. जिल्ह्यातील केवळ २० टक्के नौका मासेमारीसाठी गेल्या होत्या. खोल समुद्रात हवामान कधीही बिघडू शकते या शक्यतेने जिल्ह्यातील अनेक मच्छिमारांनी आपली पहिल्या दिवसाची समुद्रातील फेरी पुढे ढकलली आहे. मिरकरवाड्यासारख्या मोठया बंदरात शुकशुकाट दिसून आला. हवामान स्थिर झाले की, मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू होईल.
शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक खलाशी असलेल्या मच्छिमारांनी मासेमारीचा मुहूर्त साधला. पावसाचा जोर तुलनेत कमी असल्याने समुद्रकिनार्याजवळील पाण्याचा प्रवाह कमी असल्याचे मच्छिमारांतून सांगण्यात आले. त्यामुळे काही मच्छिमारांनी किनारी भागात १० वाव परिसरात मासेमारीचा मुहूर्त केला. तालुक्यातील वरवडे येथील काही छोटे मच्छिमार सकाळच्या सत्रात समुद्रात गेले होते. त्यांना कोळंबी, बांगला, सौंदाळा आदी मासे मिळाल्याचे सांगण्यात येते. परंतु अजून अनेक छोटे मच्छिमार खोल समुद्रात जाण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत.
www.konkantoday.com