
ठाकरे यांची शिवसेना संपवण्यासाठीच आम्ही बसलो आहोत :केंद्रीय मंत्री नारायण राणे
ठाकरे यांचे शिवसेना संपवण्यासाठीच आम्ही बसलो आहोत अशी कबुली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे. राज ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली असून, त्यांचं विधान राजकारणाने प्रेरित असल्याचं म्हटलं आहे.बोरिवलीतील कोरा केंद्र येथे आयोजित ट्रेड फेअरला केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी राज्यातील राजकारणावर भाष्य करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्यासाठीच आम्ही बसलो आहोत असं नारायण राणे म्हणाले आहेत.
“उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे एवढा पैसा येतो तरी कुठून? त्यांची उत्पन्नाची साधनं काय आहेत? जनतेने हे जाणून घ्यायला हवं,” असंही त्यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी शंका व्यक्त केली की, “ज्यांच्याकडे कोणताही प्रशासनाचा अनुभव नाही, अशा लोकांनी महाराष्ट्र चालवला होता”.
राज ठाकरे यांच्यावर भाष्य करत ते म्हणाले की, “राज ठाकरे यांचा जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयोग काहीतरी हेतूने आहे. मुंबई ही बहुरंगी आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांचं योगदान आहे. मुंबईतले सर्व उद्योगधंदे, बाजारपेठा मराठी माणसाने उभे केलेले नाहीत. सर्व जाती-धर्माच्या लोकांचे योगदान आहे. त्यामुळे कोणी राजकीय प्रसिद्धीसाठी वाक्य फेकू नये”.