
ही स्पर्धा म्हणजे कोकणातील शेतकऱ्यांच्या संघर्ष, सहनशीलता आणि आत्मसन्मानाचे प्रतिबिंब :उदयजी सामंत
ओंकार अॅग्रोटेक, रत्नागिरी आयोजित “माझी शेती, माझं अभियान” या अभिनव उपक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली.
शेती या आपल्या जगण्याच्या मूलभूत आधारावर आधारित ही स्पर्धा म्हणजे केवळ कलागुणांना वाव देणारा कार्यक्रम नाही, तर कोकणातील शेतकऱ्यांच्या संघर्ष, सहनशीलता आणि आत्मसन्मानाचे प्रतिबिंब आहे. आजचा कार्यक्रम छोटा असला तरी त्यात असलेली भावना आणि एकजूट ही खूप मोठी होती. महाराष्ट्रातली ही अभिनव स्पर्धा भविष्यात लाखो लोकांपर्यंत पोहोचेल, यावर माझा विश्वास आहे.
या स्पर्धेमध्ये विविध कलाकारांनी कोकणातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे आणि संवेदनशीलतेचे विषय अतिशय ताकदीनं मांडले. विशेषतः कोकणातील शेतकरी आत्महत्या करत नाहीत, कारण कोकणची माती सहनशील आहे, संवेदनशील आहे, आणि संकटांवर मात करणारी आहे – हे ठामपणे अधोरेखित करण्यात आले.
पुढील वर्षी तुम्ही विशिष्ट सामाजिक विषय देऊन स्पर्धा घेतलीत, तर कोकणातील ही स्पर्धा महाराष्ट्राच्या पातळीवरील सर्वात मोठा सांस्कृतिक उपक्रम होईल, याबाबत मी सकारात्मक आहे आणि तुमच्यासोबत आहे. तुमच्या या सामाजिक जाणिवेचं आणि तरुणाईतून उगम पावलेल्या या उपक्रमाचं मनःपूर्वक कौतुक करतो. व्यवसायाबरोबर समाजकार्याची जाणीव असणाऱ्या अशा नव्या पिढीचा मला अभिमान आहे, असे यावेळी बोलताना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.