
रो-रो कार सेवेला अद्याप प्रतिसाद नाही, आठवड्यात फक्त एकच बुकिंग
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने कोलाड ते वेर्णा दरम्यान कार रो-रो कार सेवेची घोषणा केलेली आहे. २३ ऑगस्टपासून या सेवेस प्रारंभ होणार आहे. मात्र कार रो-रो सेवेची आरक्षण प्रक्रिया सुरू होऊन आठवडा उलटला तरी कार सेवेच्या आरक्षणाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची बाब समोर आली आहे. या सेवेबाबत विचारणा करण्यासाठी ३८ कॉल्स आल्याचे रेल्वेच्या अधिकार्यांकडून सांगण्यात आले. यातील एकाच व्यक्तीने कार वाहून नेण्यासाठी बुकिंग केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे गणेशभक्तांना गाव गाठताना कसरतीचा प्रवास करावा लागतो. विलंबाच्या प्रवासासह जागोजागी पडलेल्या खड्यांमुळे गणेशभक्तांचे हाल होत असतात. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रशासनाने २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत हलक्या वजनांची वाहने वाहण्यासाठी कार रो-रो सेवा जाहीर केली आहे. २१ जुलैपासून याची आरक्षण प्रणाली खुली झाली. मात्र आठवडाभराचा कालावधी उलटूनही एकाच व्यक्तीने रो-रो सेवेतून कार वाहून नेण्यासाठी बुकिंग केली आहे. कारण कार रो-रो सेवा गैरसोयीची असल्याचा सूर आळवला जात आहे. या रो-रो कार सेवेऐवजी अतिरिक्त जादा गाड्या सोडण्याचा आग्रह गणेशभक्तांकडून होत आहे.www.konkantoday.com