
कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर मोठा चरसचा साठा!
अलिबाग : कोकणातील सुप्रसिद्ध अशा समुद्रकिनाऱ्यावर अमली पदार्थांचा मोठा साठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे… हा साठा समुद्रकिनाऱ्यावर कसा आला याचा तपास आता पोलीस करत आहेत.मुरुड तालुक्यातील काशिद हे पर्यटकांचं हॉट फेवरेट डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाते. रुपेरी वाळू सुरुचे बन, फेसाळणाऱ्या लाटा, आणि सभोवतालचा निसर्ग यामुळे हा किनारा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र आहे. पण सध्या हा किनारा कुंडली पदार्थ तस्करीचा केंद्रबिंदू झाला आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कारण समुद्र किनाऱ्यावर अमली पदार्थांचा मोठा साठा आढळून आला आहे, पोलीसांनी पंचनामा करून ११ किलोंचा चरस या अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहे.
काशिद समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद रित्या प्लास्टिक गोणी आढळून आली असल्याची खबर मुरुड पोलिसांना मिळाली होती. पोलीसांनी पथक पाठवून या गोणीची तपासणी केली असता, त्यात ११ किलो १४८ ग्रॅम चरस आढळून आले. ज्याची बाजारातील किंमत ५५ लाख ७४ हजार रुपये आहे. पोलीसांनी पंचनामा करून ही गोण जप्त केली असून, त्यातील अमली पदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. दरम्यान या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यातील विवीध कलमा अंतर्गत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील काशिद हे प्रमुख पर्यटन स्थळ आहे. देशभरातील लाखो पर्यटक या ठिकाणी येत असतात. येथील समुद्र किनाऱ्यावर मोठा अमली पदार्थ साठा सापडल्याने, खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच मुरूड आणि अलिबाग परिसरात अंमली पदार्थांची तस्करी करणारी एक टोळी पोलिसांनी जेरबंद केली होती. ज्यात नेपाळ आणि उत्तरप्रदेश मार्गे अमली पदार्थ आणून स्थानिक व्यवसायिकांच्या मदतीने त्याची पर्यटक आणि तरुणांना विक्री केली जात असल्याचे समोर आले होते. या कारवाईत पोलीसांनी १३ जणांना अटक केली होती. त्यांच्याकडून १३ लाख ६१ हजार रुपये किमतीचे चरस जप्त करण्यात आले होते.
पोलीस अधीक्षक पदाची सुत्र स्विकारल्यानंतर आँचल दलाल यांनी जिल्ह्यात अमली पदार्थ तस्करी विरोधात झिरो टॉलरन्स मोहीम उघडली आहे. पोलीस दलाला अमली पदार्थ तस्करीविरोधात व्यापक मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या प्रकरणात कारवाईत हयगय केल्यास खातेनिहाय चौकशी आणि कारवाईचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी अमली पदार्थ तस्करी विरोधात धाडी टाकण्यात आल्या होत्या, त्यामुळे पोलीसांच्या कारवाईच्या भीतीने ही चरस भरलेली गोणी समुद्र किनाऱ्यावर टाकून दिली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रतिक्षा खेतमाळीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील यांचे पथक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.