
सोनललक्ष्मी घाग रत्नागिरी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी
काँग्रेस पक्षाच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची धुरा आता पक्षाच्या निष्ठावंत नेत्या आणि राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या सोनललक्ष्मी घाग यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर काँग्रेसने संघटनात्मक फेरबदल करत नव्या नेतृत्वाला संधी दिली असून, त्याचाच एक भाग म्हणून ही नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीमती घाग यांचा काँग्रेसमध्ये दीर्घ कार्यकाळ असून, त्यांनी प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. पक्षासाठी त्यांनी घेतलेली अविरत मेहनत आणि संघटनात्मक क्षमतांमुळे त्या नेहमीच आदर्श कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या या कामाची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या नेमणुकीनंतर जिल्ह्यात काँग्रेसला नवे बळ प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
या निवडीबाबत प्रतिक्रिया देताना श्रीमती घाग म्हणाल्या, “काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म, जाती, वर्गांना समान संधी देणारा आणि लोकशाही मूल्यांना समर्पित असलेला सेक्युलर पक्ष आहे. पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला मी न्याय देईन. जिल्ह्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि पक्षाची ताकद तळागाळात वाढवणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट राहील.”
सोनललक्ष्मी घाग यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे