
मोठी बातमी! मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल समोर आला आहे. या बॉम्बस्फोट प्रकरणातील सातही आरोपींची कोर्टाने निर्दोष सुटका केली. तब्बल १७ वर्षानंतर या प्रकरणाची सुनावणीपूर्ण झाली. एनआयएच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सर्व आरोपी निर्दोष असल्याचे सांगितले.या प्रकरणात भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या मुख्य आरोपी बनवण्यात आले होते. प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सातही आरोपींची कोर्टाने निर्दोष सुटका केली आहे.
एनआयएच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल जाहीर करताना सांगितले की, ‘संशयाच्या आधारे आरोपींना शिक्षा देऊ शकत नाही. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या मालकीची दुचाकी होती हे सिद्ध झालं नाही. दुचाकीचा चॅसी नंबरही रिकव्हर झाला नाही. ब्लास्ट स्कूटरमध्ये झाला हे देखील सिद्ध करता आले नाही. या प्रकरणाच्या तपासात अनेक त्रुटी आहे. पंचनामा योग्य झाला नव्हता. जागेवरून हाताचे ठसे जप्त करण्यात आले नव्हते.’
न्यायालयाने पुढे असे देखील सांगितले की, ‘मालेगावमध्ये स्फोट झाल्याचे सरकारी वकिलांनी सिद्ध केले. पण दुचाकीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता हे सिद्ध करण्यात ते अपयशी ठरले. एटीएस आणि एनआयएच्या आरोपांमध्ये खूप फरक आहे. प्रसाद पुरोहितांनी बॉम्ब बनवला आणि पुरवल्याचा कोणताही पुरावा नाही. प्रत्यक्षदर्शिंनी देखील त्यांचे जबाब बदलले होते.’