
मत्स्य पदवीधरांची मत्स्य विभागात थेट भरतीसाठी शासनाने दखल घ्यावी, मत्स्य व्यवसाय प्रतिनिधींची ना. नितेश राणे यांच्याकडे मागणी
रत्नागिरी
राज्यातील मत्स्य पदवीधरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी मत्स्य महाविद्यालयाच्या माजी पदवीधरकांनी मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.
मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होत नाह. मत्स्य व्यवसायातून राज्याला सर्वाधिक रोजगार मिळत असताना मात्र यातील पदवीधरकांना बेरोजगार राहावे लागते. मात्र ना. नितीह राणे यांनी मत्स्य ला कृषी दर्जा मिळवून दिल्यानंतर या क्षेत्रातील पदवीधरांना संधी उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या ना. राणे यांची भेट घेऊन विविध मागण्या मांडल्या आणि त्याचे निवेदन दिले.
मांडलेल्या मागण्यामध्ये शासनाच्या अधिनस्त असलेल्या मत्स्यव्यवसाय विभागात मत्स्य सहायक, मत्स्य निरीक्षक यासारख्या पदांची भरती गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे. सुशिक्षित आणि प्रशिक्षणप्राप्त उमेदवारांची संख्या मोठी असूनही भरती न झाल्याने त्यांचे नुकसान होत आहे. यासाठी शासनाने तातडीने भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. मत्स्य विद्याशाखेतील डिप्लोमा, पदविका व पदवीधारक विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीत स्थान मिळावे यासाठी विशेष भरती मोहिमा राबवाव्यात. खासकरून मत्स्य विभागातील सहाय्यक/निरीक्षक यांसारख्या पदांवर विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्यासाठी शासनाने विशेष धोरण आखावे. राज्यातील मत्स्य महाविद्यालयांना एकत्र करून स्वतंत्र मत्स्य विद्यापीठ स्थापण्याची मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे. यामुळे संशोधन, अभ्यासक्रम आणि उद्योगाभिमुख शिक्षण अधिक व्यापक पातळीवर राबवता येईल.
याबाबत ना. नितेश राणे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या मागण्यांचा प्रधान्याने विचार करण्याचे आश्वासन दिले.