
तुरळ सांगडेवाडी येथे कोंबड्यांच्या पोल्ट्रीमध्ये शिरला बिबट्या, वन विभागाकडून सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात मुक्तता
संगमेश्वर : तालुक्यातील तुरळ सांगडेवाडी येथील रहिवासी मधुकर चव्हाण यांच्या राहत्या घराच्या मागे असलेल्या कोंबड्यांच्या पोल्ट्रीमध्ये बिबट्या शिरल्याची घटना आज (२७) सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती वनविभागाला दिल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत योग्य ती खबरदारी घेऊन तब्बल अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला सुरक्षितरित्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले. आणि त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर हा बिबट्या तंदुरुस्त असल्याची खात्री करून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
याबाबत वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संगमेश्वर तालुक्यातील तुरळ सांगडेवाडी येथील मधुकर चव्हाण यांच्या राहत्या घराच्या मागे असलेल्या कोंबड्याचे पोल्ट्रीमध्ये बिबट्या शिरल्याची माहिती मनसेचे जिल्हाप्रमुख जितेंद्र चव्हाण संगमेश्वर देवरूख परिमंडळ वन अधिकारी यांना दिली. त्यानंतर सर्व स्टाफ रेस्क्यू टीम पिंजरा व इतर साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले; तोपर्यंत या ठिकाणी ग्रामस्थांची प्रचंड गर्दीह झाल्याने ती पांगवण्यासाठी पोलिसांना प्राचारण करण्यात आले. त्यानंतर या पोल्ट्री फार्मच्या सभोवार योग्य ती खबरदारी घेऊन शेडनेट लावले. तसेच पोल्ट्रीच्या मुख्य दरवाजावर पिंजरा लावून वरील भागात लाकडी फळ्या करण्यात आल्या. पोल्ट्री फार्ममध्ये असलेल्या चार कंपार्टमेंटमध्ये फिरत असलेल्या बिबट्याला योग्य ती खबरदारी घेऊन अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्यास सुरक्षितरित्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले.
यावेळी घटनास्थळी परीक्षेत्र वन अधिकारी (रत्नागिरी) प्रकाश सुतार, परिमंडळ वन अधिकारी न्हाणू गावडे, वनरक्षक (साखरपा) सहयोग कराडे, वनरक्षक (फुणगूस) आकाश कडुकर, वनरक्षक (दाभोळे) श्रीमती सुप्रिया काळे, वनरक्षक (जाकादेवी) श्रीमती शर्वरी कदम, वनरक्षक (कांदळवन कक्ष, रत्नागिरी) किरण पाचारणे, वनरक्षक (आरवली) सुरज तेली, वनरक्षक (वनउपज तपासणी नाका साखरपा) रणजीत पाटील, प्राणी मित्र महेश धोत्रे, निसर्गमित्र अनुराग आखाडे, संदीप गुरव, संदीप उजगावकर हे उपस्थित होते. तसेच संगमेश्वरचे पोलिस निरीक्षक श्री. चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक श्री. गावित, हेड कॉन्स्टेबल श्री. जाधव, अरुण वानरे, पोलिस कॉन्स्टेबल श्री. लोखंडे व श्री. खाडे यांच्यासह तुरळचे सरपंच सहदेव सुवरे, उपसभापती दिलीप सावंत, तुरळच्या पोलिस पाटील श्रीमती वर्षा सुर्वे, पोलिस पाटील (हरेकर वाडी) संजय धाकटे, पोलीस पाटील (गोळवली) अनंत पाध्ये, पत्रकार दीपक तुळसणकर व मिलिंद चव्हाण, श्री. विचारे, श्री. कडवईकर, पापा चव्हाण उपस्थित होते.
रेस्क्यू कामी स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. बिबट्याला कोणताही विलंब न करता सुरक्षितरीत्या ताब्यात घेतल्याबाबत ग्रामस्थांनी वनविभागाचे कौतुक केले. वन अधिकारी यांनी ग्रामस्थांचे चांगले सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. जेरबंद केलेल्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी पशुवैद्यकीय अधिकारी कडवई श्री. बेलोरे यांच्याकडून करून घेण्यात आली. बिबट्या मादी असून वय अंदाजे अडीच ते तीन वर्ष आहे. ही मादी बिबट्या तंदुरुस्त असल्याने तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आल्या. या रेस्क्यूची कार्यवाही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती गिरीजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी चिपळूण श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरीजा देसाई यांनी केले आहे.