
राज्याला पुढे नेणे, कोकणचा विकास करणे हे आमचे ध्येय – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रत्नागिरी, दि. 27 : राज्यातील एकही माणूस उपाशी झोपता कामा नये. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. राज्यातील एकही माणूस उपचाराविना, औषधाविना मरता कामा नाही. राज्यातील शेतकरी आत्महत्या करता कामा नये. राज्यातील तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. हा आपला अजेंडा आहे. सिंधुरत्न योजना सुरु करण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू, असे सांगतानाच खेड येथील नाट्यगृहाला दिलेले माँसाहेबांचे नाव हे त्यांना श्रध्दांजली आहे. राज्याला पुढे नेणे, कोकणचा विकास करणे हे आमचे ध्येय आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी प्रतिपादन केले.

खेड येथील स्व. मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र इमारत नुतनीकरण कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. श्री. शिंदे यांनी कोनशिला अनावरण करुन आणि फित कापून तसेच बटन दाबून रंगमंचाचा पडदा उघडून आणि श्रीफळ वाढवून लोकार्पण केले. यावेळी माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्री डाॕ उदय सामंत, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम, गृहराज्य मंत्री योगेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार संजय कदम, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सुरुवातीला माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, नाट्यगृहात येताना बाहेरचे आणि नाट्यगृहाच्या आतील काम पाहिल्यानंतर ते खऱ्या अर्थाने उत्तम प्रकारचे नाट्यगृहाचे काम झाल्याची खात्री देणारे आहे. नाट्यगृहात आतमध्ये आल्यानंतर शहरातील नाट्यगृहात आल्यासारखे वाटते. रामदासभाईंचा वाढदिवस आणि नाट्यगृहाचे लोकार्पण हा दुग्धशर्करा योग आहे. वाढदिवसानिमित्त रामदास भाईंच्या माध्यमातून जनतेला दिलेले हे गिफ्ट आहे, असे बोललो तर वावगं ठरणार नाही. या नाट्यगृहाला दिलेले माँसाहेबांचे नाव हे त्यांना श्रध्दांजली आहे. रामदास भाई यांच्या संकल्पनेतून आज येथे उभे राहिलेले नाट्यगृह हे मुंबई सारख्या शहरातील नाट्यगृहालाही लाजवेल असे नाट्यगृह आहे. याबद्दल राज्यमंत्री योगेश कदम यांचे मनापासून अभिनंदन करतो. आपण 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकरण असे काम करत असतो.

या नाट्यगृहात 3 दिवस नाट्यप्रेमींसाठी मेजवानी आहे.
आपल्याकडे नो रिझन ऑन दि स्पॉट डिसीजन असे काम केले जाते. त्यामुळे विकासाच्या प्रकल्पांबाबत आपण तात्काळ सही करुन मोकळा होतो आणि त्याचा तात्काळ निधी वर्ग होतो. अडीच वर्ष जे काम केले ते आपल्यासमोर आहे. त्यामुळे अशी नाट्यगृहे उभी राहिली. रस्ते, पाणी अनेक सुविधा आपण देतो. याबरोबरच माणसाच्या धकाधकीच्या जीवनात विरंगुळा म्हणून मनोरंजन व्हायला हवे, त्यामुळे यामध्ये नाट्यगृहांचे खूप महत्त्व आहे. दापोलीत नाट्यगृहासाठी 15 कोटीचा निधी देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
राज्यातील एकही माणूस उपाशी झोपता कामा नये, एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, राज्यातील एकही माणूस उपचाराविना, औषधाविना मरता कामा नाही. राज्यातील शेतकरी आत्महत्या करता कामा नये, राज्यातील तरुणाला हाताला काम मिळाले पाहिजे, हा आपला अजेंडा आहे. सिंधुरत्न योजना सुरु करण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू, असेही ते म्हणाले.अडीच वर्षात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून साडेचारशे कोटी रुपये लोकांचे जीव वाचविण्यासाठी आपण दिले. आपण महाराष्ट्रातील जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस आणण्याचा प्रयत्न करत आहोत. राज्याला पुढे नेणे, कोकणचा विकास करणे हे आमचे ध्येय आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी, रोजगार निर्मितीसाठी सरकार काम करत आहे. मुंबई सिंधुदुर्ग एक्सेस कंट्रोल रोड, मुंबई गोवा सागरी महामार्गबाबत काम सुरु आहे, कोकणातील 9 खाड्यांवर पुल बाधण्याबाबतचे काम प्रगतीपथावर आहे.
एमएमआरडीच्या धर्तीवर कोकण विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली, त्याला आपण मजबूत करतोय. काजू बोर्ड केले आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून मोठे प्रकल्प कोकणात येत आहेत, असेही ते म्हणाले.
पालकमंत्री डॉ.सामंत यांनी रामदास भाईना आपल्या मनातील सर्व इच्छा परमेश्वारांनी पूर्ण कराव्यात, अशा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यात तीन नाट्यगृह आहेत, या तिन्ही नाट्यगृहांना श्री. शिंदे यांच्या पुढाकाराने रत्नागिरी येथील स्वांतत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहासाठी 15 कोटी, चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासाठी 15 कोटी रुपये आणि या नाट्यगृहासाठी देखील 13 कोटी मिळाले आणि खऱ्या अर्थाने या जिल्ह्यात सांस्कृतिक चळवळ टिकली पाहिजे, यासाठी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी काम केले आहे, हे गर्वाने सांगितले पाहिजे. राज्यमंत्री श्री. कदम यांच्या मागणीनुसार या नाट्यगृहाच्या सोलर पॅनेलसाठी 80 लाखांचा निधी दिल्याचेही त्यांनी सांगितले.
रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री श्री. गोगावले यांनी वाढदिवसानिमित्त रामदास कदम यांना शुभेच्छा दिल्या व अद्ययावत उभे राहिलेल्या नाट्यगृहाबाबत राज्यमंत्री श्री. कदम यांचे कौतुक केले. माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
राज्यमंत्री श्री. कदम यांनी 15 वर्षापासून बंद नाट्यगृहाच्या कामासाठी 13 कोटीचा निधी दिल्याबद्दल श्री. शिंदे यांचे आभार मानले. येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून 48 कोटीची नळपाणी योजना मंजूर झाल्याचे व त्याचे काम सुरु झाल्याची माहिती दिली. वाढदिवसानिमित्त रामदासभाईंना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन व दीपप्रज्ज्वलन करुन करण्यात आली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
000