
पालीच्या लक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात आजपासून धार्मिक कार्यक्रम.
रत्नागिरी : तालुक्यातील पाली- पाथरटचे ग्रामदैवत व अनेक कुळांचे कुलदैवत असणाऱ्या पालीच्या मुख्य श्री लक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात श्रावण मासानिमित्त आजपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पवित्र मासातील धार्मिक सोहळ्यांसाठी या मुख्य मंदिरात महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक,
गोवा, गुजरात यासह परदेशातून येऊन भाविक अध्यात्मिक सेवा, भक्ती करीत असतात. त्यामुळे या सोहळ्याचे विशेष आकर्षण असते. तसेच पालीचे हे मंदिर दक्षिणाभिमुख असून देवाचा वार रविवार आहे यामुळे देवाला दक्षिणकेदार असे संबोधले जाते.
पालीच्या मुख्य मंदिरात २७ जुलै, रविवार रोजी सकाळी आठ वाजता वैयक्तिक अभिषेक, एकादष्णी, लघुरुद्र, पवमान असे धार्मिक कार्यक्रम होणार असून यासाठी देवस्थानमार्फत पौरोहित्यसाठी गुरुजींची व्यवस्था आहे. त्यानंतर दुपारी १२.३० ते १.०० वाजेपर्यंत नैवेद्य, दुपारी १.०० ते १.३० वाजेपर्यंत आरती, महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम होतील. रविवार ३ ऑगस्ट रोजी याप्रमाणेच सर्व नियोजित धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. गुरुवार दिनांक ७ ऑगस्ट रोजी श्रावण शुद्ध त्रयोदशी असून या दिवशी सायंकाळी ४.०० वाजता मंदिरात रक्षासूत हा ३६० फेरे असलेला श्री लक्ष्मीपल्लीनाथ व श्री महालक्ष्मी यांच्या गळ्यात घालण्याचा कार्यक्रम होईल. चंद्र वर्षानुसार ३६० दिवस सर्व भक्तांचे रक्षण व्हावे म्हणून हे रक्षासुत देवाच्या गाभाऱ्यापासून ते प्रत्येकाच्या हातात देत रांगेत देवाच्या तळी पर्यंत नेऊन तेथे घाट दुपारची होऊन भाविक ते तोडून आपल्या हातात बांधतात व त्यानंतर पुजारी मानकरी व ग्रामस्थांना गळ्यात घालण्यासाठी व घरी नेण्यासाठी पोवते वाटप करून हा अविस्मरणीय सोहळा संपन्न होतो. हेच पोवते भाद्रपद गणेश चतुर्थीला गणेशाच्या प्राणप्रतिष्ठा केलेल्या मूर्तीच्याही गळ्यात घालण्याची प्रथा परंपरा आहे. तसेच १० ऑगस्ट रोजी श्रावण मासातील तिसऱ्या रविवारी सकाळी ६.०० वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सोमवार ११ ऑगस्ट रोजी सकाळी ६.०० वाजेपर्यंत अखंड २४ तास देवाच्या नामसंकीर्तनाचा हातात विना घेऊन अभंग, भजन, कीर्तन, आरती असा कार्यक्रम होतो. या दिवशी इतर धार्मिक कार्यक्रम होत नाहीत. १७ ऑगस्ट रोजी श्रींच्या मंदिरात ४० पौराहीत करणाऱ्या गुरुजींच्या उपस्थितीत महारुद्र होतो यानंतर नैवेद्य आरती महाप्रसाद होऊन श्रावण मासातील सर्व कार्यक्रमांची सांगता होते.
पालीचे मुख्य श्री लक्ष्मी पल्ल्लीनाथ देवस्थान हे कऱ्हाडे ब्राह्मण, मराठा, सोनार, कुणबी, कुंभार यांच्यातील काही कुळांचे कुलदैवत व पाली पाथरट सहित तीन गावांचे ग्रामदैवत आहे. या श्रावण मासातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थानचे मुख्य मानकरी तथा अध्यक्ष संतोष नारायण सावंतदेसाई यांनी केले आहे.