
जयगड ग्रामस्थांकडून वाटद एमआयडीसीचे समर्थन आणि स्वागत
रत्नागिरी : तालुक्यातील वाटद खंडाळा येथे प्रस्तावित असलेल्या एमआयडीसीचे जयगड ग्रामस्थांनी समर्थन करत स्वागत केले आहे.
यासंदर्भात जयगड येथे ग्रामस्थांनी एमआयडीसीच्या समर्थनार्थ पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन लिहिले असून या निवेदनाद्वारे त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये हा नियोजित प्रकल्प आणल्याबद्दल आमदार डॉ. उदय सामंत यांचे अभिनंदन केले आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, “आम्ही जयगड परिसरातील स्थानिक नागरिक भूमिपुत्र असून सध्या वर्तमानपत्रातून, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून, सोशल मीडियामधून नियोजित वादद एमआयडीसीबाबत काही बातम्या समजल्यामुळे, स्थानिक जागरुक नागरीक म्हणून आमचेसुद्धा काही उत्तरदायित्व जाणून आपणाकडे लेखी मनोभूमिका मांडत आहोत. या नियोजित वाटद एमआयडीसीमधील येणाऱ्या देशाच्या संरक्षणाविषयक उत्पादनाच्या कारखान्याविरोधात कोणतीही विधातक बाजू माहित नसताना निव्वळ विरोध करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधाला जनतेचे आंदोलन न म्हणता देणारी केविलवाणी आणि उपद्रवमूल्य जाणवून देणारी म्हणावे लागेल हे कोणत्याही दृष्टीकोनातून जनआंदोलन होवू शकत नाही. जयगड येथील उर्जानिर्मिली प्रकल्प, जेएसडब्ल्यू बारमाही बंदर, मे. चौगुले यांचे बारमाही आंग्रे बंदर, नियोजित तवसाळ – जयगड शास्त्री खाडी पूल यामुळे हा परिसर जगाशी, भारताशी चांगल्या तन्हेने जोडला गेला आहे. अश्यावेळी या दळणवळणाच्या सोयीसुविधांचा लाभ घेऊन चांगले चांगले उद्योग या परिसरात येणे हे परस्परपूरक असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
त्याचप्रमाणे विविध प्रकारचे उद्योगधंदे या जवळच्या बंदरांचा फायदा घेऊन कार्यरत झाल्यामुळे परिसरात पिकणारी आंबा, काजू, फणस, रातांबे, इतर सर्व शेतमाल, मत्स्यउत्पादने यांना स्थानिक बाजारपेठेतच उठाव येईल. नवीन वाढणाऱ्या लोकवस्तीमुळे वाटद परिसरात स्थानिक उद्योगधंद्यांना बरकत येईल. आपण स्वतः या नियोजित प्रकल्पाला आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आणल्यामुळे आपल्या सक्षम नेतृत्वाखाली स्थानिक गरजू बेरोजगार तरुण-तरुणींसाठी नियोजित प्रकल्पामध्ये सामावून घेण्यासाठी विविध प्रकारची शिक्षण व्यवस्था, प्रशिक्षण व्यवस्था नक्कीच देण्यात येईल. या प्रकल्पासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना, जमिनदारांना एमआयडीसीकडून विविध प्रकारच्या प्रोत्साहनात्मक योजना देण्यात येतील. प्रदूषणविरहित प्रकल्प असल्यामुळे आमच्या कोकणच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे नक्कीच नुकसान होणार नाही याची आम्हाला खात्री आहे, असे या निवेदनात नमूद केले आहे.
एमआयडीसी प्रकल्प कार्यान्वित होताना सांडपाण्याच्या नियोजनाची दक्षता घेतली जाईल. स्थानिक शेती बागायती यांच्या पिकांच्या संरक्षणासाठी व्यवस्था उभारली जाईल. प्रकल्पाला पूरक ठरणारी नवीन बाजारपेठ व्यवस्था उभारताना स्थानिकांना प्राधान्य दिले जाईल. याबद्दल ठोस आणि कायमस्वरूपी कार्यप्रणाली उभारली जाईल, एमआयडीसी प्रकल्प उभारणी होताना आणि पूर्णत्वास गेल्यावर मूळ स्थानिक भूमिपुत्रांना सर्वच रोजगार संधी-मध्ये प्राधान्य देणारी कार्यप्रणाली आपण स्वतः नक्कीच तयार करून, तिची अंमलबजावणी कराल हा ठाम विश्वास आंम्हा सर्वांनाच आहे म्हणून आंम्ही या नियोजित प्रकल्पाचे मनःपूर्वक स्वागत करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो, अशा प्रकारचे समर्थन जयगड ग्रामस्थांनी आपल्या निवेदनातून केले आहे.
या निवेदनावर जयगड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनिरुद्ध कमलाकर साळवी, प्रमोद प्रभाकर घारगे, नारायण चंद्रकांत काताळकर, शौकल उमर डांगे, अनिल बाळू कोबळे आदी ग्रामस्थांनी सह्या केल्या आहेत.