अजितदादा सहा वाजताच आयटीपार्क हिंजवडीत; विकास कामाच्या आड आल्यास ३५३ नुसार गुन्हा दाखल करण्याचे निर्देश, कोणीही…

पिंपरी : राजीव गांधी आयटी पार्क हिंजवडी मधील वाढती वाहतूक कोंडी, नागरी समस्यांची पाहणी उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुन्हा आज (शनिवारी) सकाळी सहा वाजताच केली. विकास कामाच्या आड कोणी आले, तो कोणीही असो, अजित पवार असले तरी ३५३ नुसार सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश त्यांनी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना दिले.

मे महिन्यात झालेल्या पावसाळ्यात आयटी पार्क वॉटर पार्क झाले होते. त्यामुळे आयटीनगरी हिंजवडीतील समस्या ऐरणीवर आल्या आहेत. वाहतूक कोंडी, नागरी समस्या सोडवण्यासाठी अभियंत्यांनी आंदोलने केली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन आठवड्यापूर्वी हिंजवडीतील समस्यांची पाहणी केली होती. दोन आठवड्यापूर्वी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी सुरू झाली आहेत का, त्यानुसार विकास कामांना सुरुवात केली आहे का, याची शनिवारी अजित पवार यांनी पाहणी केली. वाहतूक कोंडी, रस्ते या नागरी समस्या सोडविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यावेळी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, विकास कामाच्या आड कोणी आले, तो कोणीही असो, अजित पवार असले तरी ३५३ नुसार सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कोणी आडवा आला तर एखादा समजून सांगावे. प्रत्येकजण काही तरी बोलेल, माझे हे करा, ते करा असे सुरू होईल. ते होऊ द्यायचे नाही. एखादाच संपूर्ण कामच करून टाकायचे, आपले असे ठरले आहे की कोणी मध्ये आले की ३५३ दाखल करायचे, कोणीही असले, तरी ३५३ दाखल करायचे, त्याशिवाय हे काम होणार नाही.

हिंजवडीतील समस्यांची पाहणी करून जाताना अजित पवार मोटारीत बसत होते. त्याचवेळी हिंजवडीचे सरपंच तिथे आले. काहीतरी अजित पवार यांना सांगत होते. त्यावर तुम्हाला काय सांगायचे ते सांगा, मी ऐकून घेतो. मला काय करायचे ते मी करतो. आपले वाटोळे झाले. हिंजवडीचे आयटी पार्क पुणे, महाराष्ट्रातून हैदराबाद, बंगळुरूला चालले आहे. मी कशाला सकाळी सहा वाजता येऊन पाहणी करीत आहे. मला कळत नाही का, माझीही लोक आहेत. परंतु, ते केल्याशिवाय गत्यंतर नाही, असे अजित पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button