
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या तबलावादन अलंकार परीक्षेत रत्नागिरीचा अथर्व आठल्ये देशात प्रथम
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या तबला वादन अलंकार परीक्षेत रत्नागिरीच्या अथर्व आठल्ये याने सर्वाधिक गुण मिळवून देशामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. अलंकार ही पदव्युत्तर पदवी समजली जाते.
अथर्व म्हणाला, २०२४ मध्ये तबलावादनातील अलंकार परीक्षा झाली. अलंकार अभ्यासक्रम २ वर्षांचा असतो. अलंकार प्रथम आणि अलंकार पूर्ण असे २ वर्ष शिकण्याचे २ भाग असतात. ते झाल्यावर अलंकार परीक्षा देता येते. आपण डोंबिवलीच्या पं. प्रवीण करकरे यांच्याकडे तबलावादनाचे शिक्षण घेतले. मला तबलावादनात अलंकार परीक्षेत सर्वाधिक गुण मिळाले. या परीक्षेत सादरीकरणामध्ये तीन ताल आणि झपताल हे दोन तास सादर केले होते.
मुंबईतील प्रभादेवी येथे १८ ऑगस्ट रोजी रविंद्र नाट्यमंदिरामध्ये पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. यापैकी गुरूदेवजी पटवर्धन पुरस्कार, उस्ताद इनाम अली पुरस्कार तथा कै. विष्णू भिकाजी माईणकर पुरस्कार, हरी ओम ट्रस्ट वाद्य प्रथम पुरस्कार असे तीन पुरस्कार आठल्ये याला प्रदान केले जाणार आहेत. दीक्षांत समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जातील. अथर्वने मिळवलेल्या या यशाबद्दल शहरातील संगीत वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.www.konkantoday.com