
सासऱ्यांनी वारंवार कामे सांगितल्याने वैतागलेल्या सुनेने जेवणात विष मिसळून ठार मारण्याचा केला प्रयत्न, सासरा व पती रुग्णालयात दाखल.
संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब रेवाळेवाडी येथे घरगुती वादातून विष प्रकरण उघडकीस आले आहे. सासऱ्यांनी वारंवार कामे सांगितल्याने वैतागलेल्या सुनेने जेवणात विष मिसळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र हाच विष प्रयोग पतीच्याही जीवावर बेतला आहे. या विषबाधेमुळे पतीलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.देवरूख पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगन्नाथ सोलकर (वय 60) यांच्याकडून वारंवार घरकामाची जबाबदारी टाकली जात असल्याने त्यांची सून स्वप्नाली सोलकर (वय 32) नाराज होती. या पार्श्वभूमीवर तिने 22 जुलै रोजी रात्रीच्या जेवणात विष मिसळले.
मात्र, हेच जेवण तिचे पती साजन सोलकर (वय 34) यांनी देखील घेतल्याने त्यांनाही विषबाधा झाली. विषबाधेनंतर दोघांनाही त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या नंतर प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. दोघांवर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विष प्रयोगाचा प्रकार जिल्हा रुग्णालयात उघड झाल्यानंतर पतीने आपल्या पत्नी विरोधात देवरुख पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.या प्रकरणी साजन सोलकर यांनी देवरूख पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सुनेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.