
प्रा. डॉ. लीना जावकर यांच्या कम्युनिकेशन स्किल्स पुस्तकाचे प्रकाशन
सावर्डे (चिपळूण) :: येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सह्याद्री पॉलिटेक्निकमध्ये कार्यरत असलेल्या प्रा. डॉ. लीना जितेंद्र जावकर यांनी, प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविकेच्या विद्यार्थ्यांकरिता क्रमिक अभ्यासक्रमानुसार लिहिलेल्या आणि निराली प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या कम्युनिकेशन स्किल्स या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पॉलिटेक्निकचे प्राचार्य मंगेश भोसले व लेखक-पत्रकार आणि निराली प्रकाशनचे मार्केटिंग असोसिएट धीरज वाटेकर यांच्याहस्ते झाले.
यावेळी व्यासपीठावर कॉलेजचे उपप्राचार्य उदयसिंग लांडगे, जनरल सायन्स विभागप्रमुख कुसुमडे, मेकॅनिकल विभागप्रमुख खानविलकर, इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख कबाडे, ऑटोमोबाईल विभागप्रमुख साळुंखे आणि सिव्हिल विभागप्रमुख पेटकर, आयटी विभाग प्रमुख ओकटे, कॉम्पुटर विभागप्रमुख सुषमा बने आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या मनोगतात बोलताना जावकर यांनी, ‘केवळ चार महिन्यांच्या अंतराने दुसरे पुस्तक प्रकाशित होत असल्याबद्दल निराली प्रकाशन, सह्याद्री संस्था आणि विद्यार्थी वर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त केली. शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या निराली प्रकाशन पुणे यांच्याअंतर्गत पुस्तक प्रकाशित होणे ही अतिशय समाधानाची गोष्ट असल्याचे डॉ. जावकर म्हणाल्या. हे पुस्तक प्रकाशित होण्यामागे कॉलेजचे प्राचार्य मंगेश भोसले, निराली प्रकाशनचे मनेजिंग डायरेक्टर जिग्नेश फुरिया आणि कोकण-गोवा प्रतिनिधी धीरज वाटेकर यांनी मोलाचे सहकार्य असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी निराली प्रकाशनचे मनेजिंग डायरेक्टर जिग्नेश फुरिया यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी धीरज वाटेकर यांचे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यान झाले. कॉलेजयीन पिढीने आयुष्याची वाटचाल करीत असताना कोणत्या गोष्टींचे भान राखले पाहिजे आणि आव्हानात्मक परिस्थितीत प्रगती कशी साधायची याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. समाज माध्यमांवरील जग हे आभासी असून त्याच्या वापराबाबतही वाटेकर यांनी मार्गदर्शन केले. डॉ. जावकर यांच्या पुस्तकाबाबत बोलताना त्यांनी, निराली प्रकाशन समूहाकडून केवळ गुणवत्तेमुळेच अवघ्या चार महिन्यात एकाच लेखिकेची सलग दोन पुस्तके प्रकाशित झाल्याचे म्हटले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य भोसले यांनी कॉलेजच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा आपल्या मनोगतातून घेतला.
यावेळी या पुस्तकाची तांत्रिक बाजू सांभाळणारा विद्यार्थी साहिश जोशी आणि विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सह्याद्री पॉलिटेक्निकच्या सभागृहात संपन्न झालेल्या प्रकाशन सोहळ्यास विविध विभागांचे प्रमुख, विविध प्राध्यापक, आणि प्रथम वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पल्लवी बोरोले, प्रा. दिपाली पांचाळ यांनी तर आभार प्रा. मदन कुंभार यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन टेक्निकल टीमच्या विद्यार्थ्यांनी केले.