
रत्नागिरीतील महिला पोलिस हेड काँस्टेबलचा प्रसूतीदरम्यान मृत्यू
रत्नागिरी : जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील महिला कक्षात कार्यरत असलेल्या महिला पोलिस हेड काँस्टेबलचा प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेली असताना आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना ( २५ जुलै) रोजी दुपारच्या सुमारास घडली.
सांची सुदेश सावंत (३८, रा. हेरिटेज सोसायटी, आरोग्य मंदिर, रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ती नऊ महिन्यांची गरोदर होती. गुरुवारी रात्री तिच्या नातेवाईकांनी तिला प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी तिला अचानकपणे आकडी आल्याने ती बेशुद्ध पडली. तिला अधिक उपचारांसाठी दुसर्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचारांदरम्यान शुक्रवारी दुपारी ३.१८ वाजण्याच्या सुमारास तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. सांची सावंत हिचे पतीही पोलिस विभागातील श्वान पथकात पोलिस अंमलदार म्हणून कार्यरत असून या दाम्पत्याला दोन मुली आहेत. सांची ही तिसर्यावेळी गरोदर असताना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाली होती. परंतु शुक्रवारी सकाळी तिला आकडी येऊन ती बेशुद्ध पडली. तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी तिला शहरातीलच दुसर्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितल्यावर सांचीच्या पतीने तिला तातडीने दुसर्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. दुर्दैवाने तिचे मुलही दगावले असून सावंत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास उत्तरीय तपासणीसाठी सांचीचा मृतदेह जिल्हा शासकिय रुग्णालयात नेण्यात आला.
दरम्यान सांचीचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच पोलिस अधिक्षक कार्यालय, शहर पोलिस ठाणे, श्वान पथकातील पोलिस कर्मचारी तसेच शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते.