
राज्य व आंतरराष्ट्रीय उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी सैनिक/पत्नी/पाल्यांचा सन्मान ; २० सप्टेंबरपूर्वी अर्ज करा
*रत्नागिरी, दि. २१ : जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी सैनिक/पत्नी/पाल्य यांचा सन्मान करण्यात येणार आहे. राज्यस्तरावरील कामगिरीसाठी रु.२५ हजार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीसाठी रु. ५० हजार इतका गौरव निधी, प्रमाणपत्र व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. तरी इच्छुक माजी सैनिकांनी संबंधित कार्याबद्दलची कागदपत्रे, गुणपत्रे, सैन्य सेवा पुस्तक, ओळखपत्र यांसह दिनांक २० सप्टेंबर पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे जसे खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य संगीत, गायन, नृत्य वादन इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार प्राप्त माजी सैनिक, नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे माजी सैनिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये इयत्ता १० वीच्या परीक्षेमध्ये ९० व इयत्ता १२ वीच्या परीक्षेमध्ये ८५ टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण माजी सैनिक/विधवांचे पाल्य, पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला माजी सैनिक/पत्नी/पाल्य त्यांच्या कार्याबद्दल सन्मान करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क – जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रत्नागिरी. दूरध्वनी : ०२३५२-२२३२१९ येथे संपर्क साधावा.000




