
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया दोन महिने विलंबाने सुरू.
मे महिन्यात होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया दोन महिने विलंबाने सुरू झाली आहे.पहिल्या टप्प्यात संवर्ग १ मधील ७६ शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्यात आल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. शिक्षकबदल्यांचे चार टप्पे होणार असून, संवर्ग ३ आणि ४ मधील प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया जूनमध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु तांत्रिक अडचणींमुळे बदल्यांची प्रक्रिया सुरू होण्यास जुलै महिना सुरू झालेला आहे. संवर्ग १ मध्ये दिव्यांग शिक्षक, गंभीर आजारी, अपंग, विधवा, परितक्त्या, ५३ वर्षांवरील शिक्षक यांचा समावेश आहे.
आठ दिवसांपूर्वी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने बदल्यांची ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली. त्यात ९५ इच्छुक शिक्षकांनी ऑनलाईन अर्ज भरलेले होते. त्यातील पात्र ठरलेल्या ७६ शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत. दोन दिवसांनी संवर्ग २ म्हणजेच पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत पात्रसाठी ऑनलाईन अर्ज भरून घेतले जाणार आहेत. बदल्यांची प्रक्रिया एकूण चार टप्प्यात होणार आहे. त्यातील पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. संवर्ग ३ मध्ये अवघड क्षेत्रातील बदलीसाठी पात्र ठरलेल्यांचा समावेश आहे. अवघड क्षेत्रात ३ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना यामध्ये अर्ज सादर करता येणार आहे. यासाठी २०२२ मध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागाने निश्चित केलेली अवघड क्षेत्रातील शाळाची यादी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामध्ये सुमारे ९०० शाळा अवघड क्षेत्रात आहेत. संवर्ग ४ मध्ये बदलीपात्र शिक्षकांचा समावेश आहे. एकाच शाळेत ५ वर्षे आणि अवघड क्षेत्रात १० वर्षे काम केलेल्या शिक्षकांचा समावेश असतो. जिल्ह्यातील ११०० शिक्षक बदलीपात्रच्या यादीत आहेत