
चिपळूणच्या माजी नगराध्यक्ष हेमलता बुरटे यांचे निधन*
चिपळूण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्त्या सौ. हेमलता बुरटे (वय अंदाजे ८५) यांचे रविवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या अल्पशा आजाराने त्रस्त होत्या व रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्यांच्या निधनाने चिपळूण शहरातील एक सशक्त सामाजिक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.हेमलताताई बुरटे या चिपळूणमधील नामवंत वकील शांतारामबापू बुरटे यांच्या पत्नी होत. बुरटे दांपत्याने सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात आपला ठसा उमटवलेला होता. करंजेश्वरी देवस्थान, चिपळूण अर्बन बँक, चिपळूण नगर परिषद आदी संस्थांमध्ये शांतारामबापूंचे सक्रिय योगदान होते.
हेमलता बुरटे यांनी नगर परिषदेत नगरसेविका आणि नगराध्यक्ष म्हणून काम करताना आक्रमक, अभ्यासू व लोकहितैषी कार्यकर्ती अशी प्रतिमा निर्माण केली होती. त्यांच्या कार्यकाळात अनेक नागरी सुविधा आणि महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांना चालना मिळाली होती.त्यांच्या निधनानंतर चिपळूण शहरातील विविध सामाजिक, राजकीय आणि नागरी क्षेत्रातून तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. चिपळूण नगर परिषद, चिपळूण अर्बन बँक, करंजेश्वरी देवस्थान, तसेच विविध सामाजिक संघटनांतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.