आजीची भाजी रानभाजी अमृतासमान गुळवेल अन् शेवळी..

‘आजी आणि तिची रानभाजी’ ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी ‘आजीची भाजी रानभाजी’ ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजच्या भाज्या आहेत गुळवेल अन् शेवर/शेवळी..

गुळवेल एक बहुपयोगी औषधी वनस्पती आहे. वारुडवेल, अमृतवेल, अमृतवल्ली अशी स्थानिक नावे आहेत. हिंदीत गिलोय तर संस्कृतमध्ये गडुची किंवा अमृता नावाने ओळख आहे. ताप, तहान, जळजळ, वांती यावर उपयुक्त आहे. पित्तवृध्दीच्या काविळीत गुणकारी व त्वचारोगात उपयोगी आहे. वारंवार मूत्र वेग तसेच प्लीहा वृद्धीत उपयुक्त. कुष्ठ व वातरक्तविकाराही उपयुक्त. गुळवेलीची भाजी मंदावलेले पचन, पित्त, अपचन यावर उपयुक्त. भूक वाढवते आणि शरीराला शक्ती देते. कोणत्याही प्रकारचा ताप कमी करण्यास मदत करते. कावीळ कमी होण्यास मदत होते. मधुमेहींसाठी साखरेची पातळी नियंत्रित करते आणि त्यामुळे येणारा अशक्तपणा कमी करते. नेहमीच्या सर्दी, खोकला, ताप यावर गुणकारी. रक्तातील दोष कमी करून त्वचेचे विकार बरे करण्यास मदत करते. कामाचा ताण आणि शारीरिक थकवा दूर करते. गुळवेलीची पाने स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावीत. गरम तेलात चिरलेला कांदा व लसूण लालसर होईपर्यंत परतून घ्यावे. त्यानंतर चिरलेली गुळवेलीची भाजी, तिखट, मीठ घालून चांगले परतून घ्यावे. वाफ देऊन भाजी शिजवून घ्यावी.

*शेवर/शेवळी*

शेवळ ही भाजी आपल्याला साधारण पावसाळ्याच्या सुरुवातीला बघायला मिळते. जंगलात ही भाजी मिळते. कुठलीही भाजी करण्याआधी ती स्वच्छ धुऊन घ्यावी. भाजीचे टोक कापून टाकावे. देठानंतरच्या शेवटच्या भागावर एक पेर पिवळसर दाण्यासारखा असणारा भाग काढून टाकावा. भाजीवर मक्याच्या कणसासारखे दोन – तीन वेष्टन असतात. राहिलेला निमुळता भाग गोलाकार चिरून घ्यावा. तव्यावर भरपूर तेल घालून भाजून घ्यावी. भाजून झाल्यावर ती भाजी एका छोट्या कुकरमध्ये टाकून, पाणी घालून सात-आठ शिट्या काढाव्यात कुकर थंड झाल्यावर पाणी काढून भाजी परतायला घ्यावी. कढईत फोडणीसाठी तेल गरम करून, त्यात मोहरी, हिंग, बारीक चिरलेला कांदा घालून परतावे.कांदा लाल झाला की त्यात हळद घालून, उकडलेली भाजी घालून परतावी. कांदा खोबरे गरम मसाल्याचे वाटण आणि लाल तिखट व थोडे पाणी घालून भाजी शिजवावी. थोड्या वेळाने मीठ, चिंचेचा कोळ आणि काकडांचा काढलेला रस घालून भाजी अजून थोडा वेळ शिजू द्यावी.भाजी थोडी पातळ असावी. चला तर मग कशा झाल्या भाज्या कळवा बरं का..!

*-प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते

जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button