
स्कॉर्पिओने धडक दिल्यानंतर झालेल्या वादात दोन तरुणांवर हल्ला करून त्यांच्या मोबाईलमधून जबरदस्तीने ४ हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतल्याची घटना.
मुंबईहून वेंगुर्ला येथे जाणाऱ्या गाडीला स्कॉर्पिओने धडक दिल्यानंतर झालेल्या वादात दोन तरुणांवर हल्ला करून त्यांच्या मोबाईलमधून जबरदस्तीने ४ हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतल्याची घटना १७ जुलै रोजी पहाटे राजापूर डोंगरफाटा येथे घडली.प्रकरणी आठ जणांविरोधात राजापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शशिकांत शंकर परब (वय ६०, रा. वेंगुर्ला, सिंधुदुर्ग) हे त्यांचा मुलगा शुभम परब आणि त्याचा मित्र हर्षल नागेश साटेलकर यांच्यासोबत मारुती सुझुकी एसएक्स4 (MH 02 BP 5922) या गाडीतून मुंबईहून वेंगुर्ल्याकडे निघाले होते. पहाटे ३ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास, राजापूर ब्रिज ओलांडून डोंगरफाटा येथे पोहोचल्यावर त्यांच्या गाडीला पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या पांढऱ्या स्कॉर्पिओ (MH 18 AJ 7060) या गाडीने डाव्या बाजूने जोरदार धडक दिली.
या अपघातानंतर स्कॉर्पिओमधून सात ते आठ जण गाडीतून उतरले आणि त्यांनी शुभम परब व हर्षल साटेलकर यांना हाताच्या ठोशांनी व बुक्क्यानी मारहाण करत शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी शुभम परब याच्या मोबाईलमधून जबरदस्तीने ₹४,००० ची ऑनलाईन पेमेंट ट्रान्सफर करून घेतली.या घटनेनंतर शशिकांत परब यांनी अभिषेक परमेश्वर लोखंडे आणि त्याच्यासोबत असलेल्या २० ते ३५ वयोगटातील सात ते आठ अनोळखी व्यक्तींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार १७ जुलै २०२५ रोजी रात्री ८ वाजून १६ मिनिटांनी राजापूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.