रत्नागिरीत सायबर संस्कार कार्यक्रमात डॉ. अक्षय फाटक करणार मार्गदर्शन.

रत्नागिरी नगरपरिषद, रत्नागिरी पोलिसांतर्फे आयोजन ३ ऑगस्ट रोजी सावरकर नाट्यगृहात होणार व्याख्यान

रत्नागिरी : समाजात सध्या ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, व्यावसायिक, उच्चभ्रू अशा व्यक्तींची सायबर फसवणूक केली जात आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी समाजावर सायबर संस्कार होण्याची गरज आहे. याकरिता रत्नागिरी नगरपालिका व रत्नागिरी पोलिसांच्या सहकार्याने तज्ज्ञ डॉ. अक्षय फाटक यांचा सायबर संस्कार कार्यक्रम आयोजित केला आहे. येत्या ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे.दैनंदिन जीवनाचा एक मोठा आधार किंवा घटक झालेल्या मोबाईलचा सध्या चाललेला गैरवापर रोखण्यासाठी, तो कसा वापरावा, तो कसा वापरू नये यासंदर्भात सायबर संस्कार कार्यक्रमात डॉ. फाटक मार्गदर्शन करणार आहेत.

व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक प्रकारचे संस्कार त्याच्यावर गुरू आई-वडील, नातेवाईक, मित्र यांनी करायचे असतात. बालपणात आई-वडिलांनी केलेले, शाळा, कॉलेजमध्ये शिक्षकांनी केलेले आणि मित्रमंडळींच्या सहवासातले. सामाजिक संस्कारही आवश्यक असतात. यामध्ये एका नवीन संस्काराची गरज निर्माण झाली आहे ती म्हणजे सायबर संस्काराची. याकरिता हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे.एकविसाव्या शतकात भारतात डिजिटल क्रांती झाली आणि सेलफोनचा (मोबाईल) वापर प्रचंड प्रमाणात वाढला. रोजच्या जगण्यातील अनेक गोष्टींसाठी माणूस मोबाईलवर अवलंबून झाला. कोविड महामारीच्या काळात शाळा बंद असल्याने अपरिहार्यता म्हणून हाच मोबाईल विद्यार्थ्यांच्या हातात आला.

कोविड नंतर जगरहाटी पूर्ववत झाली पण विद्यार्थ्यांच्या हातातील मोबाईल त्यांच्या हातातच राहिला. प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू याप्रमाणे या काळात मोबाईलच्या उपयोगासोबतच त्याचे उपद्रव दृश्यमान झाले आणि सायबर क्राईम या नव्या गुन्ह्याचा जन्म झाला. याचा परिणाम आर्थिक, नैतिक आणि चारित्र्य यावर होवू लागला.हे सर्व रोखण्याचा प्रयत्न करायचा असेल तर सर्वांनीच सायबर सज्ञान होण्याची गरज निर्माण झाली आहे पण दुर्दैवाने आपल्या कुठल्याही शिक्षणपद्धतीत हा विषय आवश्यक तेवढा अजून आलेला नाही. त्यामुळेच या व्याख्यानाचा जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक, महिला, नागरिक, ज्येष्ठांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button