
विधानभवनातील राड्याबाबत राज ठाकरेंचे आव्हान! म्हणाले, स्वतःच्या लोकांवर कारवाई करून दाखवा
मुंबई : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेवर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही एक्सवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे म्हणाले…
‘काल विधान भवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची?’
सत्ता हे साधन असावं, साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे वाट्टेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं, त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधनशुचितेच्या गोष्टी बोलायच्या हा भंपकपणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल असं मी मानतो. मी तर मराठी जनतेलाच विचारेन, ‘कोणाच्या हातात दिला आहेत महाराष्ट्र?’