
राजापूर येथे गोवा राज्यातून आणलेल्या मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा साठा जप्त
रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी पहाटे राजापूर येथे गोवा राज्यातून आणलेल्या मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा साठा जप्त केला. अंदाजे २२ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा हा मुद्देमाल असून, या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक श्रीमती कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमित पाडळकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने राजापूर बसस्थानकासमोर, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर सापळा रचला. पथकाने संशयास्पद हुंडाई क्रेटा ( क्र. MH 07 AS 3458) या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये गोवा राज्यात विक्रीसाठी असलेली, मात्र महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली विविध ब्रँडची एकूण ७७ बॉक्स दारू (६६५.८ बल्क लिटर) आढळून आली.
या कारवाईत दारूसह वाहन असा एकूण २२,१९,७६०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.