कृषी अधिकाऱ्यांसाठी नारळ लागवड व व्यवस्थापनावर विशेष कार्यशाळा संपन्न.

*रत्नागिरी, दि. 15 : भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील कृषी व फलोत्पादन क्षेत्राला बळकटी देण्यासाठी “टेक्निकल एनरिचमेंट ट्रेनिंग प्रोग्राम फॉर ॲग्रीकल्चर ॲन्ड हॉर्टिकल्चर ऑफिसर्स” या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते.

नारळ विकास बोर्ड, ठाणे यांच्या पुढाकाराने आयोजित या एकदिवसीय कार्यशाळेत मोठ्या संख्येने रोपवाटिका प्रमुख, कृषी अधिकारी आणि कर्मचारी प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते, ज्यांना नारळ शेतीतील अद्ययावत तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान मिळाले.या महत्त्वाच्या कार्यक्रमाला नारळ विकास बोर्डाचे माजी उपाध्यक्ष राजाभाऊ लिमये यांची प्रमुख उपस्थिती लाभली, ज्यांनी आपल्या अनुभवाने उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा कृषी अधीक्षक शिवकुमार सदाफुले यांनी शासकीय फळरोपवाटिकेचे प्रमुख अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.

प्रशिक्षण दोन सत्रांमध्ये विभाजन करण्यात आले होते. ज्यामुळे विविध पैलूंवर सखोल माहिती देता आली. सकाळच्या सत्राची सुरुवात नारळ विकास बोर्ड, ठाणे येथील उपसंचालक बी. चिन्नराज यांच्या प्रास्ताविकाने झाली. ज्यात त्यांनी नारळ विकास बोर्डाच्या विविध योजनांची विस्तृत माहिती दिली. यानंतर, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रातील कृषी विद्यावेत्ता डॉ. किरण मालशे यांनी नारळ लागवडीच्या आधुनिक तंत्रज्ञान आणि पद्धतींवर उपस्थितांना मार्गदर्शन केले, ज्याचा शेतकऱ्यांना थेट लाभ होईल.दुपारचे सत्र अधिक तांत्रिक विषयांना वाहिलेले होते. किटकशास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे यांनी नारळ पिकावरील किडरोग आणि त्यांच्या प्रभावी व्यवस्थापनावर अत्यंत उपयुक्त माहिती दिली.

पालघर प्रक्षेत्रातील नारळ विकास बोर्डाचे क्षेत्रीय अधिकारी, श्री. शैलेंदर यांनी नारळाच्या मूल्यवर्धनाचे महत्त्व आणि त्यातून मिळणारे आर्थिक फायदे यावर प्रकाश टाकला.या महत्त्वाकांक्षी प्रशिक्षण कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन उपविभागीय कृषी अधिकारी फिरोज शेख यांनी केले होते. समारोप प्रसंगी नारळ विकास बोर्ड, ठाणे येथील विकास अधिकारी, रविंद्र कुमार यांनी उपस्थित मान्यवर आणि प्रशिक्षणार्थींचे आभार मानले.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button