
आजीची भाजी रानभाजी. आरोग्याचा गाडा सावरणारा आघाडा
*पावसाळ्यामध्ये बहुदा पालेभाज्या खाणाऱ्यांचा मोर्चा हा रानभाज्यांकडे वळतो. एव्हाना, रानभाज्याही ग्राहकांना आकर्षित करत असतात. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा मार्फत या रानभाज्यांच्या जनजागृतीसाठी बहुधा तालुकास्तरावर रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले जाते.

आजी आणि तिची रानभाजी ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी आजीची भाजी रानभाजी ही *महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने* जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजची रानभाजी आहे आघाडा..
आघाडा वनस्पतीची मुळे, पाने, फुले, फळे औषधात वापरतात. हा कडू, तिखट, उष्ण, वायुनाशी, आम्लतानाशक, रक्तवर्धक, मूत्रजनक मुत्राम्लतानाशक, पित्तसारक गुणधर्माचा आहे. ही वनस्पती भूख वाढविणारी वात, हृदयरोग, मूळव्याध, मूतखडा, पोटदुखी, जलोदर, अपचन, अमांश, रक्तरोग आदी रोग व विकारात उपयुक्त आहे.
आघाड्याची राख वैद्यकीय द्रवात अग्रगण्य आहे. आघाड्याचा क्षार मज्जातंत्तू व हाडांना तसेच रक्तकणांना उपयुक्त आहे. आघाडा वनस्पती वाळवून नंतर ती जाळून मिळवलेली राख पाण्यात मिसळतात. वस्त्रगाळ करुन गाळलेले पाणी उन्हात सुकवतात. त्यापासून मिठासारखा क्षार जमतो. या क्षारामध्ये चुना, लोह, मीठ गंधक आदी घटक असतात. जेवणापूर्वी आघाडीचा काढा दिल्यास पाचकरस वाढतो. तर जेवणानंतर दिल्यास आम्लता कमी होते. यकृतावर आघाड्याची क्रिया फार हितावह आहे.
आघाड्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. ही भाजी पाचक असून, लघवी साफ होण्यासाठी तिचा उपयोग होतो. या भाजीच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. शरीरातील मेद कमी करण्यासाठी आघाड्याची कोरडी भाजी उपयुक्त आहे. या भाजीने मुळव्याधीच्या तक्रारी कमी होण्यास मदत होते. आघाड्याची कोवळी पाने धुवून चिरुन घ्यावीत. कढईत तेल गरम करुन, त्यात जिरे, चिरलेला कांदा, लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या घालाव्यात. चिरलेली मिरची घालावी. नंतर चिरलेली भाजी घालून मीठ घालावे. भाजी परतून झाकण ठेवावे. ती निट शिजवून घ्यावी.
दुसऱ्या पध्दतीत आघाडीची पाने धुवून चिरुन घ्यावीत. कढईत तेल घेऊन लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या घालून फोडणी घ्यावी. नंतर चिरलेली भाजी तिखट, मीठ घालून चांगली वाफ येऊ द्यावी. भाजी अर्धवट शिजल्यावर डाळीचे पीठ हळूहळू घालून भाजी एकसारखी हलवावी. ती मोकळी होईल, मंद आचेवर शिजवून घ्यावी.
तर असा हा निरोगी आरोग्याचा गाडा सावरणारा आघाडा आहे. *- प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते* *जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी* *9403464101*