
श्री रत्नेश्वर ग्रंथालय, धामणसे — सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व वृक्ष वाटप कार्यक्रम.
श्री रत्नेश्वर ग्रंथालय, धामणसे यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांची मालिका राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत १६ जुलै २०२५ रोजी दोन महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पहिला उपक्रम म्हणजे जोशी टेक्नॉलॉजी इंटरनॅशनल (JTI), अहमदाबाद यांच्या सहकार्याने आणि नंदादीप नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून प्रथम येणाऱ्या १५० लोकांना वाचनासाठी मोफत चष्मे देण्यात येणार आहेत. हे शिबिर स्व. डि. एम. जोशी सभागृह, श्री रत्नेश्वर ग्रंथालय, धामणसे येथे सकाळी १०.३० ते दुपारी ४.०० या वेळेत होणार आहे.दुसऱ्या उपक्रमात “एक पेड़ माँ के नाम २.०” या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून वृक्ष वाटप कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात काजू, बेल, चिंच, आवळा, सोनचाफा, पेरू, खैर, साग व कडू निंब या प्रकारच्या चांगल्या दर्जाच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ग्रंथालय प्रांगणात धामणसे येथे सकाळी ११ वाजता पार पडेल.नेत्र तपासणी व चष्मा वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन मा. अमर रहाटे सरपंच ग्रामपंचायत धामणसे यांच्या हस्ते व एक पेड माँ के नाम अंतर्गत वृक्ष वाटप श्री. उमेश कुळकर्णी अध्यक्ष श्री रत्नेश्वर ग्रंथालय धामणसेंं ह्यांचे हस्ते होणार आहे.
तसेच संस्थेचे उपाध्यक्ष तथा माजी सरपंच श्री विलास पांचाळ, चिटणीस श्री मुकुंद गणेश तथा बाळासाहेब जोशी, संचालक उपसरपंच श्री अनंत जाधव, श्री विश्वास धनावडे, श्री प्रशांत रहाटे व सौ. स्मिता कुळकर्णी यांचीही उपस्थिती या कार्यक्रमांना लाभणार आहे.ग्रंथपाल श्री केशव कुळकर्णी व लिपिक अविनाश लोगडे यांनी हितचिंतक, वाचन प्रेमी, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दोन्ही कार्यक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.