
शिष्यवृत्तीच्या निकालात रत्नागिरी तालुका अव्वल स्थानावर.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत फेब्रुवारी २०२५ – मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या निकालात दोन्ही इयत्तांमध्ये रत्नागिरी तालुक्याने उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्यात अब्बल स्थान पटकावले आहे.या निकालाच्या तालुकानिहाय आकडेवारीनुसार, जिल्ह्याचा इयत्ता ५ वीचा एकूण निकाल २६.९२ टक्के लागला आहे, तर इयत्ता ८ वीचा निकाल २४.७० टक्के लागला आहे. इयत्ता ५ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यातून एकूण ८,२८० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २,२२९ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. जिल्ह्याची एकूण पात्रतेची टक्केवारी २६.९२ टक्के इतकी राहिली. त्यात रत्नागिरी तालुक्याने जिल्ह्यात सर्वाधिक ३३.७३ टक्के निकाल देत अव्वल स्थान मिळवले.
या तालुक्यातील सर्वाधिक ७० विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. तर खेड तालुक्याने ३०.२९ टक्के निकालासह दुसरे स्थान तर चिपळूण तालुक्याने २९.११ टक्के निकालासह तिसरे स्थान पटकावले आहे. मंडणगड (१२५४ टक्के) आणि गुहागर (१४.५४ टक्के) या तालुक्यांचा निकाल तुलनेने कमी लागला आहे. त्यामुळे या निकालात सुधारणा करण्याची गरज आगामी काळात दोन्हीतालुक्यात निर्माण झाली आहे. इयत्ता ८ वीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून एकूण ४,३८० विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी १,०८२ विद्यार्थी पात्र ठरले. जिल्ह्याची एकूण पात्रतेची टक्केवारी २४.७० टक्के राहिली आहे. पण जी पाचवीच्या तुलनेत किंचित कमी झाली आहे. इयत्ता ८ वीमध्येही रत्नागिरी तालुक्याने आपली आघाडी कायम ठेवली आहे, या इयत्तेतही जिल्ह्यात सर्वाधिक ३९.०२ टक्के निकाल नोंदवला. या तालुक्यातील सर्वाधिक ८४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत, इ. ८ वीच्या परीक्षेत संगमेश्वर तालुक्याने २९.७५ टक्के निकालासह द्वितीय क्रमांकृ तर चिपळूण तालुक्याने २८.५३ टक्के निकालासह तृतीय क्रमांक मिळवला आहे. गुहागर (७.१३ टक्के) व मंडणगड (७.५६ टक्के) या तालुक्यांचा निकाल सर्वात कमी लागला आहे. ज्यामुळे या भागातील माध्यमिक स्तरावरील शैक्षणिक गुणवत्तेकडे अधिक लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. एकंदरीत शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात रत्नागिरी तालुक्याने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. ज्या तालुक्यांची कामगिरी समाधानकारक नाही, तेथे निकालाची टक्केवारी वाढवण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज असल्याचे समोर आले आहे.www.konkantoday.com