
चिपळूण तालुक्यातील मिरजोळीचे तत्कालीन वायरमन निलंबित.
चिपळूण तालुक्यातील मिरजोळी-कोलेखाजन येथे काही दिवसांपूर्वी तुटलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून ५ दुभत्या म्हशी ठार झाल्याने हलगर्जीपणाचा ठपका ठेवत मिरजोळीच्या तत्कालीन वायरमनला निलंबित करण्यात आले आहे. तसेच संबंधित अधिकार्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. आमदार भास्कर जाधव यांनी अधिवेशनात मांडलेल्या लक्षवेधीनंतर ही कारवाई करण्यात आली.मुदस्सर खान असे निलंबन झालेल्या वायरमनचे नाव आहे. जून महिन्यात येथे झालेल्या वादळी वार्यासह जोरदार पावसामुळे कोलेखाजन परिसरात विद्युत तार तुटून पडली होती. याचा प्रमोद कंदम यांच्या ६ म्हशींना झटका लागला. त्यातील ५ म्हशींचा तडफफडून जागीच मृत्यू झाला. तर एक म्हैस गंभीर जखमी झाली. घटनेनंतर दुसर्या दिवशी महावितरणच्या कार्यालयात बैठक झाल्यानंतर भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी केलेल्या सहकार्यानंतर कदम यांना नुकसान भरपाई देण्याचे अधिकार्यांनी मान्य केले. त्यानुसार ती देण्यातही आली आहे. मात्र असे असले तरी महावितरणकडून प्रत्यक्षात दिली जाणारी नुकसान भरपाई कमी असल्याचा मुद्दा आमदार शेखर निकम यांनी अधिवेशनात उपस्थित करीत मदतीची रक्कम वाढवण्याची मागणी केली होती.तर दुसरीकडे आमदार जाधव यांनी घटना घडल्यानंतर अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी वेळेत आले नाहीत. त्यांच्या हलगर्जीपणामुळेच ५ म्हशी ठार होऊन शेतकर्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई केलीत, असा मुद्दा उपस्थित केला. यामुळे महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांनी वायरमन खान यांना निलंबित केले असून काही अधिकार्यांना कारणे दाखवा नोटीस धाडली आहे. यामुळे अन्य अधिकारी, कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.www.konkantoday.com