
सिंधुदुर्ग हा शांत व संयमी जिल्हा-सिंधुदुर्गच्या नूतन अति. पोलिस अधीक्षक नयोमी साटम
चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीचे विविध प्रकार नेहमी घडत असतात. तेथील गुन्ह्यांचे प्रमाण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे गुन्ह्यांचे प्रमाण यात खूप फरक आहे. सिंधुदुर्ग हा शांत व संयमी जिल्हा आहे.येथील गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे. तरीही जिल्ह्यातील गुन्ह्यांचे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी आपले प्रयत्न राहतील, असे सिंधुदुर्गच्या नूतन अति. पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांनी सांगितले.
मावळते अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले यांची पुणे येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त पदावर चंद्रपूर येथे सहा. अधीक्षक म्हणून कार्यरत नयोमी साटम यांची सिंधुदुर्गच्या अति.पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली. त्यांनी गुरुवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. शुक्रवारी पत्रकारांनी त्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे नयोमी साटम या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्याच्या पिसेकामते गावच्या सुकन्या आहेत. नयोमी साटम म्हणाल्या, चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात भौगोलिक तसेच समाजिक फरक खूप आहे. सिंधुदुर्ग हा माझा पितृक जिल्हा आहे. आपले शिक्षण मुंबई येथे झाले तरी गणेशोत्सव अन्य सणानिमित्त आपले गावी नेहमीच येणे-जाणे असते. त्यामुळे जिल्ह्याशी माझी नाळ पहिल्यापासूनच जोडलेली आहे.