
एसटी महामंडळाच्या वतीने राज्यभरात स्मार्ट एसटी बसेसचे वितरण
एसटी महामंडळाच्या वतीने राज्यभरात स्मार्ट एसटी बसेसचे वितरण करण्यात आले आहे. तसेच आता लवकरच एआय आधारित बसेस येणार आहेत. असे असताना आता ज्या ठिकाणी आपली लाडकी लालपरी पोहाचू शकत नाही, अशा डोंगराळ, दुर्गम भागात मिडीबस चालवण्याचा निर्णय महामंडळाने बैठकीत घेतला आहे.लवकरच महामंडळ 100 मिनी बसेस खरेदी करणार आहेत. राज्यातील ज्या ठिकाणी डोंगराळ, दुर्गम भाग आहे, अशा ठिकाणांसह रत्नागिरीसह कोकण भागात ही मिनी बस येणार असल्याचे सांगण्यात आले.
शहराबरोबरच ग्रामीण भागातील प्रवाशांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या लाडक्या लालपरीने रोज लाखो प्रवासी प्रवास करीत असतात. ‘वाट बघणार मात्र लालपरीतून प्रवास करणार’ असा अट्टहास प्रवाशांचा असतो. त्यामुळे दिवसेंदिवस प्रवाशांचा ओढा एसटी बस सेवेकडे वाढला आहे. त्यामुळे महामंडळाने तिकिटात महिलांना 50 टक्के सवलत दिली त्यानंतर ज्येष्ठांना मोफत, मुलींना शैक्षणिक पास मोफत दिले. त्यामुळे एसटीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
विविध सवलतीतून रत्नागिरी आगारासह विविध आगाराला कोट्यवधीचे उत्पन्न मिळत आहे. मात्र, कोकणासह असे काही ठिकाण आहेत त्या ठिकाणी लालपरी पोहाचू शकत नाही. त्यामुळे प्रवाशांना मोठी पायपीट करून मुख्य रस्त्यावर यावे लागते त्यामुळे त्यांचे हाल होतात. अशा डोंगराळ, दुर्गमभागात, आदिवासी वस्त्यातपर्यंत एसटी पोहोचणार असून त्यासाठी लवकरच मिनी बस खरेदी करण्यात येणार आहे. त्या मिनीबसेस कोकणात ही येणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान मिनीबस प्रत्यक्षात कोकणात आल्यानंतर कोकणातील शेवटच्या गावापर्यंत वाहतूक सेवा सुरळीत होईल तसेच ज्या ठिकाणी एसटी जात नाही अशा ठिकाणी ही मिनी बसबसने ही सेवा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.