
शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवली; जयंत पाटलांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याचं वृत्त समोर येत आहे.आपल्याला प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा असं काही दिवसांपूर्वी जाहीरपणे जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता जयंत पाटील यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे. येत्या मंगळवारी म्हणजेच 15 जुलै रोजी शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार असल्याचं वृत्त आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी भाकरी फिरवत पक्षात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन विविध चर्चा सुरू होत्या. विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आणि तेव्हापासून प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे नव्या व्यक्तीच्या हातात देण्याची मागणी जोर धरत होती.
नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी विविध नेत्यांची नावे जोरदार चर्चेत होती. यामध्ये रोहित पवार यांचे सुद्धा नाव आघाडीवर होते. पण आता शशिकांत शिंदे यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे दिली जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अद्यप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. तसेच शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार याबाबतही अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.