
आजीची भाजी रानभाजी बहुऔषधी भारंगी..
*विशिष्ट निगा अथवा खास शेती न करता उगवलेल्या भाज्यांना ‘रानभाज्या’ म्हणतात. जंगलात, शेताच्या बांधावर, माळरानात, लागवड न करता निसर्गतः या वाढत असतात. या वनस्पतींमध्ये खनिजे, महत्त्वाची मूलद्रव्ये, अत्यंत उपयोगी रसायने, अनेक औषधी गुणधर्म असतात. ऋतूनुसार या भाज्या सहज उपलब्ध होत असतात. जंगलालगतचे आदिवासी आजही त्यांचे पारंपरिक अन्न म्हणून या रानभाज्यांचा आहारात वापर करतात.
आजी आणि तिची रानभाजी ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी *आजीची भाजी रानभाजी ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजची रानभाजी आहे भारंगी..
ताप किंवा कफ असलेल्या रोगामध्ये भारंगीचे मूळ दिले जाते. कफ जास्त वाढल्याने होणाऱ्या दमा, खोकला या विकारात भारंगमूळ प्रामुख्याने वापरले जाते. सर्दी व घशातील दोषांवर सुंठ अथवा वेखंडाबरोबर भारंगमूळ दिले जाते. दम्यावर भारंग मूळ, ज्येष्ठमध, बेहडा व अडुळसाची पाने यांचा काढा करुन देतात. दमा होऊ नये म्हणून आजही कोकणात भारंगीच्या पानांची भाजी वापरतात. कोवळ्या पानांची भाजी चवीला रुचकर असते. सर्दी, खोकला, ताप, छाती भरणे या विकारात ही भाजी गुणकारी ठरते.
पोटात कृमी झाल्यास पाने शिजवून त्यातील पानी गाळून प्यावे. पोटा साफ होण्यासाठीही ही भाजी उपयुक्त आहे. भारंगीच्या फुलांचीही भाजी करतात.
देठ काढून टाकून भारंगीची कोवळी पाने घ्यावीत. कढईत तेल टाकून त्यावर मोहरी तडतडू द्यावी. त्यावर अर्धी वाटी चिरलेला कांदा परतून घ्यावा. यात लसणाच्या 4, 5 पाकळ्याही ठेचून घालाव्यात. त्यावर चिरलेली भारंगीची पाने घालावीत. झाकण ठेवून वाफ काढावी. पाण्याचा थोडा त्यावर हबका मारावा. तिखट, मीठ, हळद, थोडा गुळ, व हिंग घालून शिजवून उतरावी. भारंगीची भाजी कडू असल्याने बऱ्याच वेळा पाणी काढूनही ती केली जाते.
*भारंगीच्या फुलांची भाजी –* कडवटपणा काढून टाकण्यासाठी भारंगीची फुले 2, 3 वेळा पाण्यातून पिळून घ्यावीत. त्यानंतर ती चिरुन घ्यावीत. तेलाच्या फोडणीत मोहरीसह एक वाटी चिरलेला कांदा परतून घ्यावा. मूग डाळ धुवून घालावी. त्यानंतर चिरलेली फुले घालावीत. परतून तिखट घालावे. मंद आचेवर ही भाजी परतावी. चवीनुसार मीठ, गुळ घालून भाजी पुन्हा परतून घ्यावी. भाजलेले डाळीचे कुट, भाजलेल्या तिळाची पुड, खसखस, खिसलेले खोबरे घालूनही भाजी अधिक चविष्ट बनविता येते.
तोंडाची चव गुळचट असणे, पोट जड असणे, तोंडात चिकटा जाणवणे, सकाळी उठल्यावर डोळ्यांभोवती किंचित सूज जाणवले. अनुत्साह, हवेच्या बदलाने सर्दी होणे, कफ घट्ट होणे अशा वेळी भारंगीच्या पानांची भाजी व लसणाची फोडणी देऊन बाजरीच्या भाकरीबरोबर ती खावी.

वाचक हो..चला तर मग भारंगीची भाजी मिळवून ती करुन तिचा आस्वाद मनसोक्त घ्या आणि हो ती कशी झाली हे आम्हाला सांगायला मात्र, विसरु नका. यापेक्षा अधिक नवी कृती कुठे केली जात असेल तर आम्हाला जरुर कळवा. *- प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते* *जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी* *9403464101*