
देवरूखातील प्रगतशील शेतकरी सुयोग चाळके यांनी केली ड्रॅगन फळाची लागवड.
कोकण म्हटलं की डोळ्यासमोर आंबा, काजू फणसांच्या बागा उभ्या राहतात. तसेच येथील अनेक तरूण शिक्षणानंतर नोकरीच्या शोधात मुंबई, पुण्याच्या दिशेने वळतात. मात्र कोकणची सुपीक लाल माती केवळ पारंपारिकच नव्हे तर आधुनिक पिकांसाठीही अनुकूल आहे, हे देवरूख तालुक्यातील कर्ली गावातील उच्चशिक्षित तरूण शेतकरी सुयोग चाळके यांनी सिद्ध केले आहे.
सुयोग यांनी पारंपारिक पिकांची वाट न धरता ड्रॅगन फळ, अननस आणि केशर आंबा यांसारख्या पिकांची लागवड करून यशस्वी प्रयोग केला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेतले असून, यामधून त्यांना उत्कृष्ट आर्थिक नफा मिळत आहे.सुयोग चाळके यांचे वडील सुहास अनंत चाळके यांना शेतीची आवड होती. त्यामुळे आपणही शेती करायची असा निश्चय सुयोग चाळके यांनी लहानपणीच केला होता. दापोली येथून ऍग्रीकल्चरची पदवी घेतली. त्यानंतर सन १९९८ पासून सुरू असलेली सुयोग नर्सरी सांभाळण्यास सुरूवात केली. कोरोना काळात पुणे येथील ऍग्रोटेक कंपनीमध्ये नोकरी करायला सुरूवात केली. परंतु नोकरीची आवड नसल्याने त्यांनी दोन वर्ष एमपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यामध्येही त्यांना आवड नव्हती. अखेर त्यांनी देवरूखमधील कर्ली या आपल्या मुळ गावी येण्याचा निर्णय घेतला.www.konkantoday.com