
आजीची भाजी रानभाजी मधूमेहींसाठी गुणकारी करटोली..
*’मी आणली भाजी, ताजी ताजी भाजी..’**’आजी गं आजी.. कर ना गं भाजी..’* *या बडबड गीतातील आजी आणि तिची रानभाजी ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे.
अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी _आजीची भाजी रानभाजी_ ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत आजपासून सुरु केलेली मालिका..

गोल मटोल हिरवी पिवळसर करटोली ही खास करुन या दिवसात आपल्याला पहायला मिळतात. याला काटोली, रानकारली, काटवल असेही स्थानिक नावाने ओळखले जाते. करटोलीची पाने ताप, दमा, दाह, उचकी, मुळव्याध यात गुणकारी आहेत. तर मधुमेहामध्ये या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते.
हिरवी कोवळी करटोली प्रथम आर्धी चिरुन त्यातील बिया व गर काढून टाकावा. बटाट्याचे काप केल्याप्रमाणे ती चिरुन घ्यावीत. कढईत तेल गरम करुन हिंग मोहरी थोडेसे जिरे टाकून फोडणी घालावी. त्यात चिरुन घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालाव्यात. नंतर कांदा, मीठ, थोडेसे लाल तिखट व हळद घालून परतावे. चिरलेली करटोली त्यात घालून पुन्हा परतावीत. झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यावी. नंतर झाकण काढून मंद आचेवर पाणी न घालता 3 ते 4 मिनिटे भाजी परतावी. वरुन ओले खोबरे व आवश्यकतेनुसार चवीपुरती साखर घालावी. तयार भाजीचा मस्तपैकी आस्वाद घ्यावा आन् समाधानाची ढेकर द्यावी. मानवी आहारात प्रामुख्याने वनस्पतींचा समावेश असतोच. यामध्ये या गुणकारी करटोलींचा मिळेल तेव्हा जास्तीत जास्त समावेश करायला हरकत नाही. त्यानिमित्ताने नव्या पिढीला देखील या रानभाजीची गोडी लागण्यास मदतच होईल. *- प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते* *जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी*