
नाणीजक्षेत्री गुरूपौर्णिमेनिमित्त भक्ती व शक्तीचा जणू मळाच फुलला
लाखोंच्या गर्दीला जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे आशीर्वाद
नाणीज, दि. १० – नाणीजक्षेत्री आज भक्ती व शक्तीचा जणू मळाच फुलल्यासारखे दृश्य होते. एकीकडे कोसणारा पाऊस तर दुसरीकडे भाविकांच्या गर्दीचा महापूर. अशा निसर्गरम्य वातावरणात आज येथे चैतन्याचा सोहळा म्हणजेच गुरूपौर्णिमा उत्सव साजरा झाला. लाखो भाविकांनी एकाच वेळी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचे पूजन केले. सर्वांच्या चेह-यांवर सोहळ्यात सहभागी झाल्याचा आनंद, उत्साह, समाधानाचे भाव जाणवत होते.
आज पहाटेपासूनच सुंदरगडाला जाग आली होती. महाराष्ट्राबरोबरच गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा, छत्तीसगड अशा अनेक राज्यांतून भाविक श्रीक्षेत्री दाखल झाले होते. कार्यक्रम साडेआठला सुरू झाला परंतु भाविक सकाळी सारे आवरून सहापासूनच जागा धरून बसले होते. प्रत्येक कुटुंबाचे, मित्रांचे ग्रुप तयार झाले होते. त्यांनी पूजेचे सर्व साहित्य बरोबर आणले होते. जगद्गुरूश्रींची प्रतिमाही सोबत होती. ती समोर ठेवलेली होती. सोहळा सुरू होण्याअगोदर जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचे सुंदरगडावर आगमन झाले. सर्वांच्या नजरा तिकडे वळल्या. जयघोष सुरू झाला. त्यांनी प्रथम संतशिरोमणी गजानन महाराज मंदिरात जाऊन सर्व देवतांचे दर्शन घेतले. नंतर संतपीठाजवळ येताच सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर टाळ्यांच्या गजरात त्यांचे संतपीठावर आगमन झाले. जगद्गुरू श्रींनी हात उंचावून सर्वांना आशीर्वाद दिले. गर्दीतील एका जोडप्याला इचलकरंजीचे सा. व श्री कुमार चव्हाण यांना संतपीठावर पूजा करण्याची संधी मिळाली आणि वे.शा.सं. भालचंद्रशास्त्री शौचे गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा सुरू झाला.
सारे पूजाविधी एकाच वेळी-
संतपीठावरून गुरूजी पूजविधी सांगत होते व सारे भाविक त्यानुसार पूजा करीत होते. त्यामुळे सारे विधी एकाच वेळी होत होते. सारी गर्दी एकाच वेळी हळद-कुंकू, फुले वाहात होती. एकाचवेळी निरांजने प्रज्वलीत करीत होती. एकाच वेळी घंटानाद करीत होती. एकाच वेळी औक्षण करीत होते. सा-या सुंदरगडावर एकाच वेळी झालोला घंटांच्या मधूर ध्वनीने सर्वांग शहारून गेले. दुपारी साडेबारापर्यंत हा पूजाविधी सुरू होता. संपूर्ण सुंदरगडावर जिकडेतिकडे भक्तच दिसत होते. पाय ठेवण्यास जागा नव्हती अशी स्थिती होती. तो संपल्यावरच सारे भाविक जाग्यावरून उठले. सोहळ्यास प.पू. कानिफनाथ महाराज, सौ. सुप्रियाताई, सौ. ओमेश्वरी ताई, देवयोगी असा जगद्गुरूश्रींचा सारा परिवार उपस्थित होता. हा सोहळा संपल्यानंतर जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांना सर्वांना शुभाशीर्वाद दिले. ते म्हणाले, “आजची गुरूपौर्णिमा ही सर्वांसाठी पर्वणी होती. त्यातून सर्वांच्या जीवनाचे सोने होऊदे !”
यागाची सांगता, चरणदर्शन –
काल सकाळी सुरू झालेल्या सप्त चिरंजीव महामृत्यूजय यागाची आज दुपारी सांगता झाली. संपूर्ण दिवसभरच्या सोहळ्याचे पौरोहित्य वे.शा.सं. भालचंद्रशास्त्री शौचे गुरूजी यानी केले. त्यानंतर चरणदर्शन सोहळा सुरू झाला. आजच्या पवित्र दिवशी आपल्या गुरूंचे दर्शन व्हावे म्हणून मोठी रांग लागली होती. गुरू-शिष्य भेटीचा हा सोहळा दीर्घ काळ चालला.–