
गुरुजनांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन म्हणजे ज्ञानरुपी आशीर्वादच- जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे
रत्नागिरी, दि.१० : गुरुजनांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन म्हणजे ज्ञानरुपी आशीर्वादच, असे मार्गदर्शन चिपळूण येथील जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी केले.
तालुका विधी सेवा समिती, चिपळूण व श्रीराम शिक्षण संस्थेचे परांजपे मोतीवाला हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आज कायदेविषयक जागरुकता शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक किरण कांबळे यांनी प्रमुख पाहुणे व पॅनल विधीज्ञ नयना पवार हे उपस्थित होते. यावेळी शाळेचा प्रगती अहवाल व मराठी संस्कृतीचे जतन यावरील चित्रफित दाखविण्यात आली.

जिल्हा न्यायाधीश डॉ. नेवसे यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व उपस्थित विद्यार्थ्यांना समजावून सांगताना पौराणिक काळापासून चालत आलेल्या गुरुशिष्य परंपरेचा सन्मान करणारा पवित्र दिवस व अज्ञानाच्या अंधाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणाऱ्या गुरूजनांचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्याचे गुरू हेच खरे प्रेरक, मार्गदर्शक आणि मित्र असतात व तेच विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देतात आणि त्यांचे भविष्य घडवितात. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करण्याचे काम तसेच यशस्वी व्यक्तीमत्त्व घडवून विद्यार्थ्याच्या व्यक्तीमत्वाला पैलु पाडण्याचे काम गुरूजन करतात. कोणत्याही यशस्वी व्यक्तीमत्त्वाच्या जीवनात शालेय संस्कार व गुरूजनांचा सिंहाचा वाटा असतो. जीवनाच्या प्रत्येक वळणावर प्रगतीच्या टप्प्यांवर संस्कार आणि नितीमुल्यांचा प्रभाव पडत असतो. विद्यार्थ्यांना ध्येयपूर्ती करण्यासाठी संस्कार, शिस्त व नियोजन हे अंगिकृत करणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस शैक्षणिक क्रांती घडत आहे.

तंत्रज्ञानांचा वापर, शालेय शिक्षण पध्दतीत मोठ्या प्रमाणात होत आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईल व सोशल मीडियाचा वापर विघातक गोष्टींसाठी न करता बौध्दिक विकासासाठी केला पाहिजे, अन्यथा मोबाईलच्या अती वापराने आजही शालेय जीवनातच काही विद्यार्थी नैराश्येच्या गर्तेत जात आहेत व त्यांचे भवितव्य धोक्यात येत आहे. लैंगिक अत्याचारांच्या घटनांना प्रतिबंध घालण्याकरिता व विद्यार्थ्यांना संरक्षण देण्याच्या दृष्टीकोनातून शालेय व्यवस्थापनाने जागरूक राहणे आज काळाची गरज आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक आहेत त्यामुळे सृदृढ समाज निर्माण करण्यासाठी शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणे आवश्यक आहे, याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या संबंधीत विविध कायद्याच्या तरतुदी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या. वकील संघटनेच्या उपाध्यक्ष अॕड. नयना पवार यांनी मुलांचे कायदेविषयक हक्क, अंमली पदार्थांच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम, सायबर क्राइम, मोबाईलचा योग्य वापर व इंटरनेट वापरताना घ्यावयाची काळजी याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी वर्ग व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्ज्वलाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली मुंजेकर व सिध्दी रेडीज या विद्यार्थीनींनी केले. तसेच कार्यक्रमाचे नियोजन तालुका विधी सेवा समिती चिपळूणमार्फत करण्यात आले.