
महापालिकांच्या निवडणुका जानेवारीपर्यंत पुढे ढकलल्या जाऊ शकतात
राज्यातील विविध ६८७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याचे नियोजित असून, पहिल्या टप्प्यात ऑक्टोबरमध्ये पंचायत समिती, नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्याची चाचपणी सुरू आहे.नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषदांच्या, तर सर्वांत शेवटी डिसेंबरमध्ये महापालिकांच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) मर्यादित संख्या पाहता राज्य निवडणूक आयोगाने एकाच वेळी या निवडणुका घेण्यास असमर्थता दर्शविल्याची चर्चा आहे.एकाच वेळी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी लागणारी ‘ईव्हीएम’ उपलब्ध होत नसल्याने तीन टप्प्यांत या निवडणुका घेण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांची मुंबईत नुकतीच बैठक घेतली. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रस्तावित निवडणुकांच्या वेळापत्रकाबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश दिला असून, त्यानुसार नगरविकास विभागाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचा आदेश दिला आहे. महापालिकांच्या निवडणुका जानेवारीपर्यंत पुढे ढकलल्या जाऊ शकतात, असाही अंदाज आहे.