
गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीतील साफयिस्ट कंपनीचे उत्पादन सोमवारपासून पूर्णपणे बंद.
चिपळूण तालुक्यातील कामथे हरेकरवाडी येथील नदीत टँकरद्वारे दूषित सांडपाणी सोडल्याचा ठपका असलेल्या गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीतील साफयिस्ट कंपनीचे उत्पादन सोमवारपासून पूर्णपणे थांबले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेली दहा दिवसांची मुदत ५ जुलैला संपताच सोमवारी एमआयडीसीने या कंपनीचा पाणी पुरवठा खंडित केला आहे. मंडळाच्या या कारवाईने औद्योगिक क्षेत्रासह कामगार तसेच परिसरातही खळबळ उडाली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कामथे येथील नदीत २१ जूनच्या रात्री टँकरद्वारे रसायनमिश्रित पाणी सोडले गेले. ग्रामस्थांच्या मदतीने पाचपैकी २ टँकर अडवले, तर ३ टँकर घटनास्थळावरून पसार झाले. पोलीस प्रशासनाने हे दोन्ही टँकर ताब्यात घेऊन पंचनामा केला असता ते साफयिस्ट कंपनीतून आले असल्याचे पोलीस तपासात पुढे आले. मात्र या प्रकरणी कोणतीही कारवाई न झाल्याने शिवसेना उबाठा पक्षाचे युवासेनेचे तालुकाप्रमुख उमेश खताते व शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी थेट प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस स्थानकात धडक देत अधिकार्यांना जाब विचारल्यानंतर तिसर्या दिवशी कंपनीला उत्पादन बंद करण्याची नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून बजावण्यात आली. या नोटिसीत कंपनीवर विविध ठपके ठेवण्यात आले.www.konkantoday.com




