
जावयाने सासऱ्याच्यादुकानातून मोबाईल चोरून त्यातील फोन पे अॅपचा वापर करून सुमारे 2 लाख 59 हजार 70 रुपयांची केली फसवणूक
सासू-सासऱ्यांवर विश्वासघात करून दुकानातून मोबाईल चोरून त्यातील फोन पे अॅपचा वापर करून सुमारे 2 लाख 59 हजार 70 रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना तालुका राजापूर येथे घडली आहे.या प्रकरणी दानिश हेमंत काझी (वय 29, रा. वडवली, राजापूर, सध्या रा., वडाळा) याच्याविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी जायदा मुनीर काझी यांच्या माहितीनुसार, दानिश हा त्यांचा जावई असून, त्याने 26 मे 2025 रोजी सायंकाळी 7:45 च्या सुमारास ‘मोबाईल चार्जर दुकानात राहिला आहे’ असे सांगून अमन जनरल स्टोअर्स या दुकानाची चावी घेतली. विश्वासाने चावी दिल्यानंतर त्याने दुकानातील मोबाईल चोरून नेला आणि त्यातील फोन पे अॅपद्वारे विविध खात्यांमध्ये 2,59,070 रुपये ट्रान्सफर केले.
त्यानंतर, ही बाब लक्षात आल्यानंतर जबाब मागितल्यावर दानिशने जायदा काझी यांना शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली, अशी माहिती तक्रारीत नमूद आहे.
ही संपूर्ण घटना 26 मे ते 29 जून 2025 या कालावधीत घडली असून, 7 जुलै रोजी रात्री 8:39 वाजता राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे