
भरधाव स्कुल व्हॅनमधून विद्यार्थी पडले खाली; अंबरनाथमधील धक्कादायक घटना,
शाळेत मुलांना ने- आण करण्यासाठी पालकांनी रिक्षा- व्हॅन केलेल्या असतात. मात्र व्हॅन चालक अगदी बेजबाबदारपणे गाड्या चालवत असल्याचे अंबरनाथ मध्ये घडलेल्या घटनेने पुन्हा एकदा समोर आले आहे.धावत्या स्कुल व्हॅनमधून विद्यार्थी मागून रस्त्यावर पडल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. स्कुल व्हॅन चालकाच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात घडला असून यानंतर आता तरी खासगी अवैध स्कुल व्हॅन चालकांवर कारवाई होणार का? असा संतप्त सवाल पालक वर्गातून विचारला जात आहे.
अंबरनाथच्या फातिमा शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन सोमवारी एक खासगी स्कुल व्हॅन विमको नाक्याच्या दिशेने जात होती. नेताजी मार्केट परिसरात भरधाव स्कुल व्हॅनच्या डिक्कीचा दरवाजा अचानक उघडला आणि त्यातून दोन विद्यार्थी रस्त्यावर पडले. धक्कादायक बाब म्हणजे स्कुल व्हॅन चालकाच्या हा प्रकार लक्षातही आला नाही आणि तो भरधाव वेगाने गाडी घेऊन तिथून निघून गेला. मात्र मागून येणाऱ्या एका रिक्षाचालकाने हा अपघात पाहून रिक्षा थांबवली.व्हॅनमधून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या या दोन्ही विद्यार्थ्यांना रिक्षा चालकाने उचलले. यानंतर या विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेत त्यांच्यावर उपचार करण्यात आले. हे विद्यार्थी पडले त्यावेळेस मागून एखादा ट्रक किंवा भरधाव वेगाने गाडी आली असता या विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला असता. मात्र सुदैवाने या अपघातात विद्यार्थी बचावले आहेत. मात्र हा अपघात समोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.




