
गोवळकोट येथे खिडकीतून शिरलेली गोळी डुकराची शिकार करताना, दोन जण ताब्यात
बंदूकीची गोळी थेट खिडकीची काच फोडून स्वंयपाक घरात घुसल्याची घटना शहरातील गोवळकोट रोड हायलाईफ या इमारतीत काही दिवसापूर्वी घडली होती. पोलिसांच्या टॉअसनंतर याप्रकरणी दोघांना येथील पोलिसांनी अटक केली आहे.विशाल विजय पवार (वय-३६, पेठमाप), नितिन धोंडू होळकर (३०, कोंढे) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. विनापरवाना बंदूकीतून डुकराच्या शिकारासाठी ही गोळी झाडल्याचे पुढे आले आहे. पोलिसांनी ही बंदूक देखील जप्त केली आहे. न्यायालयाने सोमवारी त्या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
शहरातील गोवाळकोट रोड ठिकाणी हायलाईफ ही तीन मजली इमारत असून त्यामध्ये पहिल्या मजल्यावर अशरफ तांबे यांची सदानिका आहे. २९ जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या त्यांच्या सदानिकेच्या स्वंयपाक खोलीमध्ये मोठा आवाज झाला. यावेळी त्याठिकाणी पाहिले असता एक बंदूकीची गोळी खिडकीची काच फोडून थेट स्वंयपाक घरात घुसलेली होती. भर दिवसा झालेल्या खळबळजनक प्रकारानंतर परिसरात मोठी खळबळ उडली होती. याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चिपळूण पोलीसांकडून याबाबतचा तपास सुरु असताना अशातच ही बंदूकीची गोळी शिकारीच्या उद्देशाने झाडल्याची माहिती पुढे आली होती. हाच धागा पकडून पोलिसांनी त्या अज्ञाताच्या शोधासाठी तपास गतीमान केला. असे असताना पोलिसांनी गोपनिय माहितीच्या आधारे या गोळीबार प्रकरणी विशाल पवार, नितिन होळकर या दोघांना ताब्यात घेत अटक केली आहे.




