
जयगड घाटरस्त्यावरील धोकादायक वृक्ष तोडण्याची अनिरुद्ध साळवी यांची मागणी
जयगड : रत्नागिरी तालुक्यातील जयगड घाटरस्त्यावरील काही वृक्ष धोकादायक असून, चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात काजूचे झाड रस्त्यावर आडवे पडले. सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही; मात्र या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना धोका उद्भवू शकतो. या गोष्टीची गंभीर दखल घेत हा रस्ता अपघातग्रस्त होण्यापासून वाचवावा, अशी मागणी वेताळबाग-जयगड येथील जागरूक नागरिक अनिरुद्ध कमलाकर साळवी यांनी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या (जयगड) बंदर निरीक्षकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात श्री. साळवी यांनी म्हटले आहे की, “आपल्या महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मालकीचा जयगड येथील सुमारे ७५० मीटर लांबीचा घाटरस्ता आपल्या निगराणीत आहे. दि. ५ जुलै रोजी या रस्त्यावर एक काजूचे झाड मुसळधार पावसामुळे कोसळून संपूर्ण रस्ता बंद झाला होता. आम्हा सर्वांच्या सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. अशाच प्रकारची कोसळू शकणारी सुमारे ७ ते ८ मोठी झाडे रस्त्यावर कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.तरी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत हे धोकादायक वृक्ष तातडीने तोडून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यातील जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी मदत होईल.”