
विजयदुर्ग खाडीवर पूल बांधून दोन्ही जिल्हे राज्य महामार्गाने जोडण्याची ग्रामस्थांची मागणी.
तालुक्यातील कुंभवडे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी या दोन गावांमधून जाणा-या विजयदुर्ग खाडीवर पूल बांधून दोन जिल्हे राज्य महामार्गाने जोडावे, अशी मागणी अखिल कुंभवडे ग्रामविकास मंडळाने आमदार किरण सामंत यांच्याकडे तर मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाने सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. हा पूल झाल्यास दोन्ही जिल्हे जोडले जाऊन येथील पर्यटनाला चालना मिळेल, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
राजापूर तालुक्यातील कुंभवडे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी या दोन गावांमधील विजयदुर्ग खाडीवर पाचशे फुट लांबीचा पूल बांधून दोन्ही जिल्हे जोडावे अशी मागणी या निवेदनांद्वारे करण्यात आली आहे. तसेच हा राज्य रस्ता झाल्यास रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनपूरक असा मध्यवर्ती मार्ग जनतेच्या सेवेत रुजू होईल. शिवाय कोकणातील पर्यटनपूरक गावे एकमेकांशी जोडली गेल्याने कोकणभूमीला देवभूमी, पर्यटनभूमी आणि कॅलिफोोनया बनविण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या कार्याला चालना मिळेल, असेही नमूद करण्यात आले आहे.
या प्रस्तावित मार्गामुळे राजापूर तालुक्यातील कुंभवडे, तारळ, उपळे, प्रिंदावन, धुमाळवाडी, काशिगे, पडवे, सौंदळ, डोंगर, नाणार, घोडेपोई, सागवे, इंगळवाडी, चौके, धनगरवाडी, विलये, राजापूर, जैतापूर, अणसुरे, हातिवले ही गावे तर देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी, मुटाट, मणचे, वाघोटन, सडेवाघोटन, सौंदाळे, बापर्डे, पेंढरी, मालपे, पोंभुर्ले, पाटगाव, गोवळ आणि फणसगांव अशी अनेक गावे जोडली जातील. त्याचबरोबर या परिसरातील अनेक शैक्षणिक संस्था आणि विकासाधिन प्रकल्प एकमेकांशी जोडले जातील.या मार्गामुळे पर्यटन दृष्ट्या तारकर्ली, देवबाग, धामापूर, किल्ले सिंधुदुर्ग, किल्ले देवगड, श्रीक्षेत्र कुणकेश्वर, किल्ले विजयदुर्ग अशी पर्यटन व प्रसिद्ध देवस्थाने पर्यटकांच्या आवाक्यात येतील. पाळेकरवाडी आणि कुंभवडे मधील प्रस्तावित पूलासह रस्ता झाल्यास या रस्त्यामुळे राजापूर, देवगड, कणकवली, मालवण आणि वेंगुर्ला तालुक्यांच्या विकासालाही चालना मिळेल.www.konkantoday.com