
खड्डेमय रस्त्यातून प्रवासाचा हा शेवटचा गणेशोत्सव , पुढील वर्षी महामार्ग पूर्ण- पालकमंत्री उदय सामंत
मुंबई-गोवा महामार्गाचा 364 पैकी 21 किलो मीटरचा रस्ता शिल्लक असून त्यात साडेचार किमीचा डबल लेन रस्ता शिल्लक आहे. खड्डेमय रस्त्यातून प्रवासाचा हा शेवटचा गणेशोत्सव आहे. पुढील वर्षी महामार्ग पूर्ण झालेला असेलओव्हर ब्रीज व पुलांची कामे मार्च-एप्रिल पर्यंत पूर्ण होतील असे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, आपण आठ दिवसापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली होती. त्यावेळी अधिकारी आणि ठेकेदारांना काही सूचना केल्या होत्या. शनिवारी चिपळूण येथून रत्नागिरीत येताना केलेल्या सूचनांवर कोणती अंमलबजावणी झाली याची आपण पाहणी केली. सूचनांप्रमाणे कामाला सुरुवात झालेली असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. संगमेश्वर येथे कसबा शास्त्रीपुलाजवळ डोंगराचा भाग धोकादायक झाला होता. त्याठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यास सांगितले होते. त्या ठिकाणी तीन-चार घरे असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे काही ठिकाणी डिव्हायडरच्या मध्ये माती टाकण्यासाठी रस्त्यावरच माती आणून टाकण्यात आली होती. त्याबाबतही ठेकेदाराला सूचना करण्यात आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. 364 कि.मी.पैकी 21 किमीचा मार्ग शिल्लक आहे. त्यातील फक्त साडेचार किमी डबल लेनचे काम राहिले आहे. पण ते पुढील गणपतीच्या आधी पूर्ण होईल. चिपळूण येथील ओव्हरब्रीज एप्रिलपर्यंत, कसबा व संगमेश्वर येथील पुलांची कामे एप्रिल तर बावनदी आणि निवळी ओव्हरब्रीजचे काम मार्चपर्यंत, पाली येथील ओव्हरब्रीज मार्चपर्यंत, लांजा येथील ओव्हरब्रीज एप्रिलपयर्र्त पूर्ण होईल असे ना. सामंत यांनी सांगितले.