
.तर आम्ही गुंडगिरी करूच”, देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ विधानानंतर उद्धव ठाकरेंचा इशारा!
राज्यात हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या मुद्यांवरून गेल्या काही दिवसांपासून चांगलंच राजकारण तापलं होतं. अखेर हिंदी भाषा सक्तीचा निर्णय राज्य सरकारने रद्द केल्यानंतर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्यावतीने आज मुंबईत विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईच्या वरळीतील डोम या ठिकाणी ठाकरे बंधूंचा हा मेळावा पार पडला आहे. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या टिकेला प्रत्युत्तर देत थेट इशारा दिला आहे.
“राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात अप्रतिम मांडणी केली आहे. आजच्या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण आज आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे. एक गोष्ट महत्वाची आहे की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाट होता तो अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षदा टाकण्याची काही आवश्यकता नाही. एकत्र आलो आहेत ते एकत्र राहण्यासाठी. मला कल्पना आहे की आता अनेक बुवा, महाराज हे व्यस्त आहेत. कोणी गावी जाऊन अंगारे धुपारे करत असेल. त्या सर्वांना सांगतो आम्ही तुमच्या पुढे उभे ठाकलेलो आहोत”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.“भाषेवरून जेव्हा एखादा विषय निघतो, तेव्हा तो विषय वरवरचा विषय नसतो. आम्ही दोघांनीही भाजपाचा अनुभव घेतलेला आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं, पण आता आम्ही दोघे मिळून तुम्हाला (भाजपाला) फेकून देणार आहोत. भाजपा ही अफवांची फॅक्टरी आहे.
उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं अशी टीका भाजपाने केली, पण आम्ही कडवट हिंदुत्ववादी आहोत”, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.*उद्धव ठाकरेंची फडणवीस यांच्यावर टीका*“देवेंद्र फडणवीस जे सगळीकडे बोलले की भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही. मग जर महाराष्ट्रात न्याय मागण्यासाठी कोणी आंदोलन करत असेल आणि त्याला जर तुम्ही गुंडगिरी म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत. जर गुंडगिरी केल्याशिवाय न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूच”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
राज ठाकरे या मेळाव्यात बोलताना म्हणाल की, “सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला असला तरी आपण सर्वांनी सावध राहायला हवं. पुढे काही गोष्टी घडतील, होतील, त्याची मला कल्पना नाही. मात्र, मला वाटतं की ही मराठीसाठीची आपली ही एकजूट कायम राहायला हवी. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पुन्हा एकदा साकारावं अशी आशा, अपेक्षा व इच्छा मी व्यक्त करतो.”